गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर '30 Days Wheat Detox' (30 दिवस गहू बंद) हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या आहारात बदल करून गहू पूर्णपणे वर्ज्य करत आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवत असल्याचा दावा करत आहेत. हा केवळ एक सोशल मीडिया ट्रेंड नसून, अनेक वैयक्तिक निरीक्षणांतून, काही संशोधनांतून आणि रुग्णांच्या अनुभवांतून याचे सकारात्मक बदल समोर आले आहेत.
डॉ. रवींद्र कुलकर्णी (MD, DNB, FSCAI Cardiology) यांनी नुकतेच या विषयावर काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते, 30 दिवस गहू बंद केल्यास शरीरात 7 मोठे बदल दिसून येतात. या बदलांमध्ये पोटाचे आरोग्य सुधारण्यापासून ते शारीरिक ऊर्जेची पातळी वाढण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे.
नक्की वाचा - आवडीने केळी खाता? जाणून घ्या नुकसान; डॉक्टरांनी सांगितलं कोणी केळी खाणं तातडीने बंद करा!
30 दिवस गहू बंद केल्याने काय होईल?
- पोट फुगणे कमी होते: गहू बंद केल्याने ब्लोटिंग, गॅस आणि जेवणानंतर जाणवणारा जडपणा लक्षणीयरीत्या कमी होतो.
- वजन घटते: गहू सोडल्याने शरीरात पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते आणि मेटाबॉलिक रेट (चयापचय क्रिया) सुधारतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- ऊर्जेत वाढ: दिवसभर सतत येणारा थकवा कमी होतो आणि कामावरची एकाग्रता वाढते, ज्यामुळे शरीर अधिक उत्साही राहते.
- त्वचा सुधारते: शरीरातील दाह (Inflammation) कमी झाल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि अॅक्नेसारख्या समस्या कमी होतात.
- पचनक्रिया सुधारते: ऍसिडिटी, अपचन आणि वारंवार पोट बिघडण्याची समस्या कमी होते.
- सांधेदुखी कमी होते: शरीरातील दाह कमी करणारे हार्मोनल बदल झाल्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.
- साखरेवर नियंत्रण: इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये साखरेचे नियंत्रण सुधारते.
हे बदल कोण करू शकतात?
ज्यांना वारंवार पचनाच्या तक्रारी, सांधेदुखी, थकवा, ग्लूटेन सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे ते ही आहार पद्धत ट्राय करू शकतात.
कोणी गहू बंद करू नये?
मात्र, गहू बंद करणे सर्वांसाठी योग्य नाही. डॉ. कुलकर्णी यांनी काही लोकांना ही पद्धत टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला, किशोरवयीन मुले, कुपोषण, कमी वजन किंवा ॲनिमियाचा त्रास असलेले रुग्ण, तसेच जास्त शारीरिक श्रम करणारे खेळाडू यांचा समावेश आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, कोणताही मोठा बदल करण्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा (Dietitian) सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आहार संतुलित राहील.