जाहिरात

UIDAI : अरेच्चा! आधार कार्डाचा असाही होतो फायदा, हे 6 फायदे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे 

UIDAI : अरेच्चा! आधार कार्डाचा असाही होतो फायदा, हे 6 फायदे तुम्हाला माहिती असलेच पाहिजे 

आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. आधार कार्डासोबत प्रत्येक नागरिकाला 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळतो. या आधार क्रमांकाचा वापर बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी केला जातो. या पलिकडे आधार क्रमांकाचे बरेच फायदे आहेत जे सर्वसामान्य नागरिकांना फार माहिती नाहीयेत. हे फायदे कोणते आहेत ते आपण जाऊन घेऊयात.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

1. डिजिटल लॉकरसाठी आधार क्रमांक गरजेचा 

आधार कार्डचा वापर डिजिलॉकर (DigiLocker) साठी केला जातो. डिजिलॉकर ही भारत सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली ऑनलाइन सेवा आहे. डिजिलॉकरमध्ये प्रत्येकजण आपले महत्त्वाचे दस्तऐवज उदा. मार्कशीट, प्रमाणपत्रे, पॅन कार्ड, आणि ड्रायव्हिंग लायसन्स डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवू शकता.  आधार नंबर असल्यास तुम्हाला डिजिटल लॉकरचे लॉग इन करणे सुलभ होते. ज्यामुळे तुमचे दस्तऐवज कधीही, कुठेही डाउनलोड केले जाऊ शकतात. यामुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका कमी होतो आणि तुम्हाला ही महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज उरत नाही. 

2. शैक्षणिक योजनांचा लाभ

आधार कार्डचा उपयोग शैक्षणिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात होतो. मिड-डे मील योजना आणि शिष्यवृत्ती योजनांमध्ये आधार कार्डद्वारे विद्यार्थ्यांची ओळख पटवली जाते, ज्यामुळे लाभ थेट पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आणि पारदर्शकता वाढते. उदाहरणार्थ, आधार कार्डद्वारे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाते. आधार क्रमांकामुळे शिष्यवृत्ती तसेच इतर लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे सोपे होते. 

(नक्की वाचा-  Dividend: हे तीन शेअर्स करून देतील हमखास फायदा, गुंतवणुकीसाठी आज शेवटची संधी)

3. आरोग्य योजना आणि रुग्ण सेवा 

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सारख्या आरोग्य योजनांमध्ये आधार कार्डचा उपयोग रुग्णांची ओळख पटवण्यासाठी केला जातो. यामुळे पात्र लाभार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. रुग्णालयांमध्ये आधार कार्डद्वारे रुग्णांची माहिती त्वरित पडताळली जाते, ज्यामुळे उपचार प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम होते. याशिवाय, आधार कार्ड असल्याने चुकीच्या व्यक्तीला लाभ मिळण्याची शक्यता कमी होते.

4. रोहयो मजुरांसाठीही फायदेशीर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA) सारख्या योजनांमध्ये आधार कार्डद्वारे मजुरांची ओळख पडताळणी करणे सोपे होते. यामुळे मजुरीचे पेमेंट थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होते. रकमा थेट खात्यात जमा होऊ लागल्याने भ्रष्टाचार तसेच गैरप्रकारांना आळा बसतो. आधार कार्डमुळे मजुरांना त्यांच्या हक्काची मजुरी वेळेवर मिळते आणि योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो.

5. ऑफलाइन ई-केवायसीसाठी डिजिटल सॉल्यूशन

आधार कार्डद्वारे तुम्ही ऑफलाइन पेपरलेस ई-केवायसी (e-KYC) सुविधेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही UIDAI च्या डिजिटल सही असलेली XML फाइल तयार करू शकता. ही डिजिटल साइन तुमची ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी गरजेची असते. जिथे ऑनलाइन पडताळणी शक्य नसते तिथे सेवा पुरवठादारांना तुमची ओळख पटवण्यासाठी या डिजिटल साइनची गरज असते. यामुळे बँक खाते उघडणे, कर्जासाठी अर्ज करणे किंवा इतर सेवांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची गरज कमी होते.

(नक्की वाचा- अदाणी समूहाकडून 74,945 कोटींचा करभरणा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ)

6. मोबाइल कनेक्शन आणि टेलिकॉम सेवांसाठी सुलभता

आधार कार्डचा उपयोग नवीन मोबाइल कनेक्शन घेण्यासाठी किंवा सिम कार्ड सक्रिय करण्यासाठी केला जातो. आधार-आधारित ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोबाइल कनेक्शन घेणे जलद आणि सोपे झाले आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांची ओळख पटवणे सोपे होते आणि बनावट कनेक्शन्स किंवा फसवणुकीच्या घटना कमी होतात. याशिवाय, आधार कार्डमुळे तुम्ही तुमचे मोबाइल नंबर तुमच्या आधारशी लिंक करू शकता, ज्यामुळे भविष्यातील पडताळणी प्रक्रिया सुलभ होते.

आधार कार्डचे अनेक फायदे असले तरी, त्याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये असा सल्ला UIDAI कडून सातत्याने दिला जातो कारण  आधार क्रमांक हा गोपनीय असतो, आणि तो चुकीच्या लोकांच्या हाती लागला तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो.  थोडक्यात काय तर आधार कार्ड हे आता केवळ एक ओळखपत्र राहिलेले नसून तुमच्या रोजच्या अनेक गोष्टी सुलभ करण्यासाठी ते मदत करते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com