Afternoon Nap : अनेकांना दिवसा झोपण्याची सवय असते. विशेषत: दुपारी जेवल्यानंतर आळस येतो आणि डोळे आपोआप मिटू लागतात. याबाबत अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम उपस्थित होतो, दिवसा झोपणं योग्य आहे? दिवसा झोपल्याने आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? या विषयावर प्रसिद्ध डॉक्टर तरंग कृष्णा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी रंजक माहिती दिली आहे. काय म्हणाले डॉक्टर, पाहूया...
दिवसा झोपणं चांगलं की वाईट?
डॉक्टर तरंग यांनी सांगितलं, जर तुम्हाला दुपारी झोप येत असेल तर टाळण्यापेक्षा थोडा वेळ झोपणं फायदेशीर असू शकतं. डॉक्टर पुढे सांगतात, दुपारच्या जेवणानंतर जर तुम्ही १५ मिनिटांची नॅप घेत असाल तर तुमचा मेंदू रिचार्ज होतो. छोटीशी झोप तुमचा मूड, मेमरी आणि परफॉर्मन्सचा दर्जा अधिक सुधारतो. दुपारच्या जेवणानंतर जेव्हा तुम्ही १५ मिनिटांचा पॉवर नॅप घेऊन उठता त्यानंतर तुम्ही अधिक अलर्ट, फ्रेश आणि अॅक्टिव्ह होता. यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि शरीरात बाकीचा दिवस काम करण्यासाठी नवी एनर्जी संचारते.
दुपारी घेतलेली छोटीशी झोप मानसिक आरोग्यासाठीही चांगली मानली जाते. यामुळे तणाव कमी होता आणि मेंदू शांत राहतो. जे लोक सतत कम्प्युटर किंवा मोबाइलवर काम करतात किंवा मेंदूचं काम जास्त करतात त्यांच्यासाठी ही पॉवर नॅप फायदेशीर ठरते.
या गोष्टींकडे लक्ष द्या...
महत्त्वाचं म्हणजे दुपारची झोप ही छोटीशीच असावी. दुपारच्या वेळेत फार काळ झोपून राहू नये. जर तुम्ही १ ते २ तास झोप घेत असाल तर रात्रीच्या झोपेवर त्याचा परिणाम होतो. यामुळे झोपेचं रुटिन बिघडतं. त्यामुळे केवळ १५ ते २० मिनिटांचा पॉवर नॅप घ्या. याशिवाय झोपेची योग्य वेळ दुपारच्या जेवणानंतर मानली जाते. सायंकाळी उशिरापर्यंत झोपू नये.
दुपारी झोप घेतल्याने शरीराला थोडा आराम मिळतो आणि मेंदू पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करू लागतो. थोडा वेळ झोप किंवा नॅप तुमचं शरीर आणि मेंदू दोघांसाठी चांगली आहे. फक्त वेळेकडे लक्ष द्या.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)