Akshaya Tritiya 2026: हिंदू धर्मामध्ये वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेची तिथी धनलक्ष्मीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. अक्षय पुण्य प्राप्त करून देणारा हा सण यंदा उदया तिथीनुसार आज साजरा केला जात आहे. काशी विद्वत परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री राम नारायण द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीया 20 एप्रिल 2026 साजरी करणं योग्य ठरेल. शास्त्रानुसार या तिथीला 'जया तिथी' म्हणजेच विजय मिळवून देणारी दिव्य तिथी असे म्हटले आहे. म्हणूनच या दिवशी केलेल्या कार्याचे फळ 'अक्षय' (कधीही नष्ट न होणारे) मिळते. या अक्षय्य तृतीयेला स्नान, दानाचे धार्मिक महत्त्व आणि काही विशेष उपाय जाणून घेऊया.

अक्षय्य तृतीयेची पूजा आणि दान आजच का करावे?
प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ आणि संत स्वामी इंदुभवानंद तीर्थ महाराज यांच्या मते, अक्षय्य तृतीया नेहमी 'परवृद्धा' (चतुर्थीयुक्त) मानली पाहिजे. 'निर्णय सिंधू' या ग्रंथानुसार जर अक्षय्य तृतीयेची तिथी दोन दिवस असेल, तर दुसऱ्या दिवशीची तिथी ग्राह्य धरावी. त्यामुळेच उदया तिथीनुसार 20 एप्रिल 2026 (सोमवार) रोजीच अक्षय्य तृतीया साजरी करणे योग्य आहे, कारण याच दिवशी स्नान आणि दानाचे अक्षय पुण्यफळ प्राप्त होईल. स्वामींच्या मते अक्षय्य तृतीयेला रोहिणी नक्षत्राचा योग जुळून आल्याने झाल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.
(नक्की वाचा: Happy Akshaya Tritiya 2026 Wishes 45+: अक्षय तृतीयेचा मंगल सण ठरो सुखमय, प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश)
पुण्य मिळवण्यासाठी जलतीर्थावर स्नान करा
हिंदू मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी किंवा कोणत्याही जलतीर्थावर स्नान करून श्रीहरी विष्णूंचे ध्यान केल्यास भाविकाला पुण्यफळ मिळते. जर तुम्हाला पवित्र जलतीर्थावर जाणे शक्य नसेल, तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करावे. जर गंगाजल उपलब्ध नसेल तर पवित्र नद्यांचे स्मरण करत स्नान करावे.

हिंदू संस्कृतीत अक्षय्य तृतीयेला स्नानासोबतच दानालाही खूप महत्त्व आहे. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना किंवा मंदिरातील पुजाऱ्यांना थंड पाणी भरलेला माठ, हातपंखा, चपला, छत्री आणि सत्तू यासारख्या उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या वस्तूंचे दान करावे. या गोष्टींच्या दानामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते अशी धारणा आहे.
(नक्की वाचा: Akshaya Tritiya 2026 Wishes 25+: धन-धान्याची व्हावी समृद्धी, आरोग्य लाभो निरोगी; अक्षय्य तृतीयेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा)
अक्षय्य तृतीयेचे धार्मिक महत्त्व
अक्षय्य तृतीया केवळ धनलक्ष्मीच्या पूजेपुरती मर्यादित नाही, तर या तिथीचे अन्य धार्मिक महत्त्वही आहे. हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी भगवान परशुराम, भगवान हयग्रीव आणि नर-नारायण यांचे प्राकट्य झाले होते. त्यामुळेच या तिथीला केवळ माता लक्ष्मीच नव्हे तर भगवान विष्णू आणि त्यांच्या या अवतारांची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world