भारतीय बाजारपेठेत 'क्विक कॉमर्स' आणि जलद डिलिव्हरीची स्पर्धा तीव्र होत असताना अॅमेझॉन इंडियाने एक अत्यंत मोठी आणि आक्रमक घोषणा केली आहे. आगामी 'प्राइम डे 2026'च्या आधी कंपनी भारतात १०० हून अधिक विशेष 'अर्बन फुलफिलमेंट सेंटर्स' सुरू करणार आहे. या नव्या पायाभूत सुविधेमुळे ग्राहकांना अॅमेझॉन नाऊवर आधीपेक्षा तब्बल 4 पटीने अधिक उत्पादनांचे पर्याय अवघ्या काही मिनिटांत घरपोच मिळू शकणार आहेत.
किराणा सामानापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सर्व मिनिटांत
या नव्या मोठ्या आकाराच्या अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या व्यापक गरजा पूर्ण केल्या जातील. याद्वारे अनेक वस्तूंची डिलिव्हरी अवघ्या काही मिनिटांत केली जाईल.
किराणा व ताजी उत्पादने: फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि फ्रोजन फूड.
लाईफस्टाईल व फॅशन: कपडे, सौंदर्य उत्पादने , दागिने, शूज आणि घड्याळे.
इलेक्ट्रॉनिक्स व इतर: लहान घरगुती उपकरणे, वायरलेस डिवाईसेस, फर्निचर आणि लगेज.
इतर श्रेणी: लहान मुलांची उत्पादने (Baby Products), पाळीव प्राण्यांचे साहित्य आणि हेल्थकेअर सप्लिमेंट्स.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये पहिला टप्पा
अॅमेझॉन नाऊने यापूर्वी जाहीर केलेल्या 100 शहरांमधील 1000 हून अधिक 'मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स'च्या नेटवर्कला जोडणारा हा पुढचा प्रगत स्तर आहे. पहिल्या टप्प्यात ही केंद्रे बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद आणि मुंबई या मेट्रो शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील.
"या अर्बन फुलफिलमेंट सेंटर्सच्या माध्यमातून आम्ही आमचा माल (इन्व्हेंटरी) ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहोत, ज्यामुळे प्रगत एआय (AI) तंत्रज्ञान आणि इन्व्हेंटरी प्लॅनिंगच्या जोडीने भारतातील सर्वात सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह नेटवर्कद्वारे विस्तीर्ण श्रेणीतील उत्पादनांची डिलिव्हरी करणे शक्य होईल," असे अॅमेझॉन इंडियचे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंग यांनी सांगितले.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
2800 कोटी रुपयांची गुंतवणूक
हा जलद विस्तार अॅमेझॉनच्या 2800 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीचा एक भाग आहे. या गुंतवणुकीचा मोठा उद्देश डिलिव्हरी भागीदारांचे आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक कल्याणाचा दर्जा सुधारणे हा आहे. अॅमेझॉनने डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीची विशेष सुविधा देणारी 'आश्रय केंद्रे' स्थापन केली आहेत. हे आश्रय कुठल्याही कंपनीचे डिलिव्हरी बॉईज वापरू शकतात. या केंद्रांमध्ये वातानुकूलित (AC) आसनव्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, मोबाईल चार्जिंग स्टेशन्स आणि प्रथमोपचार किट्स उपलब्ध असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world