जाहिरात

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला करा फक्त 'हे' एक काम, मिळेल वर्षभराच्या 24 एकादशींचे पुण्य!

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य कसे मिळते? देवशयनी एकादशीचे महत्त्व आणि पूजेचा योग्य विधी सविस्तर जाणून घ्या.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीला करा फक्त 'हे' एक काम, मिळेल वर्षभराच्या 24 एकादशींचे पुण्य!
"Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशी महत्त्वाची का असते?"
Canva

- ज्योतिषी श्रीकेतन कुलकर्णी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढ शुक्ल एकादशीला शयनी एकादशी किंवा पद्मनाभा एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर योगनिद्रेत जातात आणि चार महिन्यांनंतर कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीला जागे होतात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो.

एकादशीचे अद्वितीय महत्त्व

धर्मशास्त्रांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. जसे सर्व मंत्रांमध्ये गायत्री मंत्र, सर्व देवांमध्ये भगवान श्रीविष्णू, सर्व तीर्थांमध्ये गंगामाता, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी, सर्व वृक्षांमध्ये कल्पवृक्ष, सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड तसेच सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वोच्च मानले गेले आहे. काही धर्मग्रंथांतील पारंपरिक वर्णनानुसार सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ मानला गेला आहे. वर्षातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, जप, नामस्मरण आणि पूजन केल्यास वर्षभरातील सर्व एकादशांचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी माहेरच्या आणि सासरच्या पितरांच्या सद्गतीसाठी तसेच पितृदोष निवारणासाठी संक्षिप्त भागवताचे वाचन, श्री वेंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्रनाम तसेच भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

पुराणातील माहिती

पुराणात अशी कथा आहे की एका राज्यात सलग तीन वर्षे पाऊस पडला नव्हता. तेव्हा अंगिरस ऋषींनी राजाला एकादशीचे कठोर व्रत करण्यास सांगितले. राजाने श्रद्धेने व्रत केल्यावर त्या राज्यात मुसळधार पाऊस पडला आणि प्रजेचे संकट दूर झाले. काही भक्त एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल उपवास करतात. मात्र आठ वर्षांखालील मुले, 80 वर्षांवरील वृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी आपल्या प्रकृतीनुसार उपवास करावा.

(नक्की वाचा: White Horse Swapna Shastra: स्वप्नात पांढरा घोडा दिसणे शुभ की अशुभ? पंडित कौशल पांडेय यांनी सांगितला खरा अर्थ)

दुसऱ्या दिवशी द्वादशीला श्रीविष्णूंची पूजा करावी, तुळशीमातेची पूजा करून तुळशीपत्र अर्पण करावे आणि त्यानंतरच पारणे (उपवास सोडणे) करावे. द्वादशीला योग्य वेळी उपवास सोडणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आषाढी (शयनी) एकादशीपासून चातुर्मासाचा प्रारंभ होतो. या काळात जप, तप, दान, व्रत, हरिनाम, हरिपाठ, श्रीमद्भागवत, भगवद्गीता, श्री वेंकटेश स्तोत्र आणि विष्णुसहस्रनाम यांचे पठण केल्यास त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते, अशी श्रद्धा आहे.

(नक्की वाचा: Bhagwa Rang Significance: कावड यात्रेत भाविक भगव्या रंगाचेच कपडे का घालतात? ज्योतिषींकडून जाणून घ्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व)

एकादशी ही भगवान श्रीविष्णूंची तिथी आहे. पंढरपूरचे श्री विठ्ठल हे भगवान श्रीविष्णूंचेच रूप मानले जाते. शक्य असल्यास पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घ्यावे. आषाढी एकादशीच्या दिवशी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराज, सासवडहून सोपानदेव महाराज, पैठणहून संत एकनाथ महाराज तसेच इतर संतांच्या पालख्या विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरमध्ये एकत्र येतात. घरबसल्या देखील नामस्मरण, हरिपाठ, भजन, कीर्तन, दीपदान आणि श्रीविठ्ठलाची पूजा करून ही पवित्र एकादशी भक्तिभावाने साजरी करा.

श्री विठ्ठल मंत्र

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
॥ श्री विठ्ठलाय नमः ॥
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम । पांडुरंग हरी, वासुदेव हरी । केशवा मुरारी विठ्ठला रे ॥

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com