- वैद्य उर्मिला पिटकर
Monsoon Diet: लोकांनी निरोगी राहावे म्हणून आयुर्वेदाने ऋतुचर्या या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू सामान्यपणे सांगितलेले आहेत. पण आपल्या भारताच्या दक्षिण भागात पाऊस जास्त, म्हणून शिशिर हा थंडीचा ऋतू वगळून प्रावृट (आषाढ-श्रावण) व वर्षा (भाद्रपद, अश्विन) असे पावसाळ्याचे दोन ऋतू सांगितले आहेत.
शरीरावर वातावरणाचा प्रभाव आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली
आयुर्वेदाने मानवी शरीराला या विश्वाचीच छोटी प्रतिकृती मानले आहे, त्यामुळे प्रत्येक ऋतूत बाह्य वातावरणात जसे बदल होतात तसेच मानवी शरीरातही बदल घडत असतात. या बदलांशी जर आपण जुळवून घेतले, तर आपल्याला आपले आरोग्य टिकवून ठेवता येते. म्हणूनच आयुर्वेदशास्त्राने विशिष्ट ऋतूला अनुकूल असा विशिष्ट आहार-विहार सुचवला आहे त्यालाच ऋतुचर्या असे म्हणतात. विशेष म्हणजे आपल्या वेगवेगळ्या सण, उत्सव परंपरा यांच्या माध्यमातून आरोग्य रक्षण करण्याचा उत्तम प्रयत्न, आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो.
पावसाळ्यातील पचनशक्ती आणि आहाराचे नियम
वर्षा ऋतूत हवेतला दमटपणा आणि ओलावा वाढलेला असतो, त्यामुळे पचनशक्ती (अग्नी) मंद झालेली असते. शरीरात प्रामुख्याने वातदोष वाढलेला असतो, त्याचबरोबर पित्त-कफदोषही बिघडलेले असतात. अशा काळात पचायला हलके, गरम, भाजलेले अन्न घेण्याची आवश्यकता असते. जसे भाकरी, फुलका, लाह्या, भाजून घेतलेल्या तांदळाचा भात इत्यादी. या काळात आपल्याकडे 'चातुर्मास' पाळण्याची प्रथा आहे. वेगवेगळ्या व्रतांच्या रूपाने उपवास केले जातात. काही उपवासात फक्त भाजलेली धान्ये, तर काहीत फक्त उकळलेले पाणी पितात. निर्जला एकादशीसारखे उपास पाणीही न पिता केले जातात. वर्षा ऋतूत शरीरात ओलाव्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे पाण्याची गरज कमी झालेली असते. त्यामुळे वर्षा ऋतूच्या संपूर्ण कालावधीतच पाणी अगदी आवश्यक तेवढे, मोजून मापूनच प्यावे.
दूषित पाणी आणि जलशुद्धीकरणाचे उपाय
उन्हाळ्यात पाण्याचे सर्व स्रोत आटल्यामुळे आणि पावसाळ्यात पाण्यामध्ये गाळ वाहून आल्यामुळे या काळात पाणी दूषित झालेले असते. या दूषित पाण्यामुळे जुलाब, जंत, कृमी याचा प्रादुर्भाव खूप वाढतो. म्हणूनच वर्षा ऋतूमध्ये 'तप्तशीत' म्हणजेच तापवून थंड केलेले किंवा 'अर्धावशिष्ट' उकळून अर्धे केलेले किंवा 'सिद्ध जल' सुंठ, ओवा, धणे इत्यादी औषधे घालून उकळलेले पाणी अल्प प्रमाणात प्यावे. त्यामुळे जंत, कृमी, आवेचा प्रतिबंध होतो आणि पचनशक्ती चांगली राहते.
नक्की वाचा: High Protein Dhokla: वेटलॉस करायचंय? नेहमीचा ढोकळा खाणे सोडा, सकाळी नाश्त्याला खा 'हा' हाय प्रोटीन ढोकळा
रानभाज्यांचे महत्त्व आणि आरोग्यादायी फायदे
वर्षा ऋतूत होणाऱ्या रोगांचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक औषधेही निसर्ग स्वतःहून या काळात निर्माण करतो. या दिवसात भाजीबाजारात नीट डोकावून पाहिल्यास कोकणात कुडा, भारंगी, टाकळा, शेवाळे, फोडशी तर घाटावरती तांदुळजा, घोळ अशा अनेक रानभाज्या मिळतात. या रानभाज्या कडू असल्या तरी त्यातील पाणी न काढता शिजवल्यास कृमी, जंत, जुलाब यावर उत्तम औषध म्हणून त्या काम करतात.
कुडा वनौषधीचे गुणधर्म आणि उपयोग
कुडा हे तर आयुर्वेदातील परम औषध! कुड्याच्या शेंगा आणि फुलांची भाजी उत्तम कृमिनाशक आहे. ज्यांच्या घरात आजी असेल तिथे कुड्याचे पाळ (मूळ) नक्कीच सापडेल. उन्हाळ्या लागणे, बारीक ताप, कृमी, जुलाब या पावसाळ्यामधील वात वाढल्यामुळे होणाऱ्या विकारांवर कुडा हे उत्तम औषध आहे. कुटज घनवटी या त्याच्या गोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत, पण अर्थातच त्या आपल्या वैद्याच्या सल्ल्याने घ्याव्या.
(नक्की वाचा: Soak Raisins Benefits: रोज सकाळी 8-10 भिजवलेले मनुके खाल्ल्यास काय होते? त्याचे पाणी प्यावे की नाही? वाचा डॉ. अवतारांचा सल्ला)
पावसाळ्यातील फळं खाण्याचे नियम
एकदा पाऊस पडला की उन्हाळ्यात चवदार लागणारी आंबा, फणस, जांभूळ ही फळे बेचव लागतात व झाडावरून गळून पडतात. पावसाळ्यात खाल्ल्यास त्यात किडी पडलेल्या असतात. म्हणूनच पाऊस पडल्यावर ही फळे खाणे बंद करण्याची पद्धत अनेक घरात आहे व ती योग्यही आहे. अट्टाहासाने बाराही महिने सर्व फळे खाणे, हे आरोग्यदृष्ट्या योग्य नाही. पावसाळ्यात खाण्यायोग्य फळ म्हणजे अननस. मिरपूड लावून, सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस अननस खावा, त्यामुळे पचनशक्ती वाढते व जंत आणि कृमीसाठी सुद्धा ते स्वादिष्ट आणि गोड असे औषध आहे.
रस्त्यावरील चमचमीत अन्नाचे धोके
पावसाळा म्हटला की गार हवेमुळे काहीतरी चमचमीत गरमा-गरम खावेसे वाटते. अशा वेळेस भजी-वडे खाल्ले जातात आणि तेही रस्त्यावरचे! आधीच मंद झालेली पचनशक्ती त्यात अशा पदार्थांमुळे आणखीन मंद होते. मग ताप, जुलाब, दमा, खोकला अशा आजारांना आयतंच निमंत्रण मिळतं.
पारंपरिक तळलेले व भाजलेले पदार्थ
आपल्याकडे एक म्हण आहे आषाढ तळायचा, श्रावण भाजायचा आणि भाद्रपद उकडायचा. आषाढात होणारा वातप्रकोप शांत करण्यासाठी थोडे तळलेले जरूर खावे, पण ते घरी केलेले असावे. वडे-भजी यापेक्षा तांदुळाच्या आणि साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया असे पदार्थ तळून खाण्यास हरकत नाही. भाजलेल्या गरम गरम भुईमुगाच्या शेंगा ही या काळात खायला उत्तम. पांढरी गावठी मक्याची कणसे भाजून मीठ, तेल, तिखट, लिंबू लावून खाल्ल्यास तर परमानंदच!
वातवर्धक पदार्थांचा त्याग आणि मसाल्यांचा वापर
ग्रीष्मात वातदोषाचा संचय होतो व वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो. त्यामुळे पोटात गुडगुड होणे, पोटफुगी, दमा, संधिवात असे वाताचे आजार जोर धरू लागतात. कांदा, बटाटा, वांगे, फ्लॉवर, हरभरा, चणा असे वातुळ पदार्थ म्हणूनच या काळात खाऊ नयेत. कांदेनवमी झाल्यावर चार महिने हे वातूळ पदार्थ बंद करण्याची आणि चातुर्मास पाळण्याची प्रथा आपल्याकडे आहे व ती अत्यंत आरोग्यदायी आहे. लसूण तामसी गुण वाढू नये म्हणून चातुर्मासात निषिद्ध असला तरी उत्तम वातनाशक असल्यामुळे माफक प्रमाणात लसूण वापरायला हरकत नाही. लसणाच्या तेलाचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्याने दुखऱ्या कानात घालण्यासाठी किंवा दुखऱ्या सांध्यांना चोळण्यासाठी किंवा दम लागल्यावर छातीला लावण्यासाठी अवश्य करावा. मंद झालेली पचनशक्ती हळूहळू वाढवायची आहे, म्हणून या काळात फोडणीमध्ये मोहरी, हिंग, मेथी अशा अग्निवर्धक पदार्थांचा सढळ वापर करावा. खाद्यपदार्थात पोटदुखी आणि वात कमी करणारा ओवा जरूर वापरावा. छातीत कफ साठला किंवा सर्दी-पडसे, दुखणारे सांधे यात ओव्याच्या पुरचुंडीने शेक केल्यानेही छान उपयोग होतो.
आरोग्यरक्षक सुंठ गोळी
पावसात भिजून होणारी सर्दी, जुलाब, पोटदुखी यावर आणखीन एक रामबाण औषध म्हणजे सुंठ. सुंठ पावडर, गूळ आणि तूप एकत्र करून छोट्या बोराएवढ्या गोळ्या कराव्यात. घरातील प्रत्येकाला सकाळी उठल्यावर रोज ही आरोग्यरक्षक सुंठ गोळी वर्षा ऋतूत अवश्य खायला द्यावी. अशा तऱ्हेने वर्षा ऋतूतील या वातावरणाचा विचार करता भाजून घेतलेले धान्य, ताजे गरम घरचे अन्न, उकळून आटवलेल्या पाण्याचा माफक वापर हे सूत्र आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे!
व्यायाम, अभ्यंग आणि पंचकर्म उपचार
पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला मर्यादा येतात म्हणून घरातल्या घरातच योगासने, सूर्यनमस्कार असा माफक व्यायाम करावा. आठवड्यातून एक दोन वेळा तरी सर्वांगाला तिळाच्या तेलाचा अभ्यंग (मसाज) करावा. स्नानासाठी गरम पाणी वापरावे. त्वचेचे रोग टाळण्यासाठी आंघोळ करताना टाकळा, कडुनिंब यांचे उटणे अंगाला लावण्यासाठी वापरावे. पंचकर्म उपचारापैकी बस्ती हे पंचकर्म वर्षा ऋतूत जाणकार वैद्यांकडून अवश्य करून घ्यावे. त्यामुळे वर्षा ऋतूत होणारा वातप्रकोप शांत होतो व पुढे होणारे संधिवात, पोटदुखी, दमा, खोकला हे आजार टाळता येतात.
निसर्गाचे नियम आणि आरोग्याचे रक्षण
थोडक्यात काय, निसर्गातल्या विविध ऋतूंचा आनंद खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल, तर निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. त्या त्या ऋतूत स्वतःचे रक्षण कसे करायचे ते निसर्गच आपल्याला शिकवत असतो, आणि येणाऱ्या अडचणीवरचे उपायही उपलब्ध करून देतो.
हवामान बदल आणि आधुनिक काळातील ऋतुचर्या
सध्या हवामानात खूप अनपेक्षित बदल घडताना दिसत आहेत. ऋतूंचे चक्र चांगलेच बिघडलेले आहे. प्रचंड वृक्षतोड, इंधन वापर, निसर्गातला अतिप्रमाणातला हस्तक्षेप ही मानवनिर्मित आणि काही प्रमाणात नैसर्गिक कारणेही या सर्वाला जबाबदार आहेत. त्यामुळे निश्चित अशी ऋतुचर्या सांगणे सध्या खूप अवघड होऊन बसलेले आहे. काही दिवस उन्हाळा, काही दिवस पावसाळा... सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा, रात्री पावसाळा असे विचित्र वातावरण सध्या दिसते आहे.
निष्कर्ष आणि निसर्गाचे निरीक्षण
अशा या 'पावन्हाळ्यात' आरोग्य टिकवून ठेवणे, ही खरंच तारेवरची कसरत आहे. आयुर्वेदात सांगितल्यानुसार अशा काळात जेव्हा जसे बाह्य वातावरण (ऋतू) असेल, तसे आचरण करणे आवश्यक आहे. म्हणूनच खूप गरज आहे निसर्गाच्या डोळस निरीक्षणाची आणि जे पटेल ते मनापासून आचरणात आणण्याची!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)