- डॉ. रिंकी कपूर, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट
Hair Care Tips: केस सुंदर दिसावे, यासाठी बहुतांश जण वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलयुक्त ट्रीटमेंट करतात. पुरुष आणि महिला दोघंही केसांचे सौंदर्य खुलवण्यासाठी विविध पर्याय शोधत असतात. केसांचा लुक बदलण्यासाठी कित्येक महागडे उपाय केले जातात आणि बदलत्या लाइफस्टाइलनुसार याचे प्रमाण वाढत आहे. केस स्ट्रेट किंवा कुरळे करण्यासाठी स्टायलिंग केले जाते. कित्येक ट्रीटमेंटमध्ये कंडिशनिंग एजंट वापरले जाते, ज्यामुळे केसांचे नुकसान कमी प्रमाणात होते आणि केसांवरील चमक टिकून राहण्यास मदत मिळते, असा दावा केला जातो.
हल्ली केरेटिन उपचार करण्याचेही प्रमाण वाढत आहे. धकाधकीच्या जीवनामुळे हल्ली बहुतांश लोक केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, त्यामुळे केसांना रंग करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर रासायनिक उपचारांमुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता आहे...
केमिकल ट्रिटमेंट केलेल्या केसांची काळजी कशी घ्यावी?
केसांची योग्य निगा राखा
केसांवर वापरलेल्या केमिकलमुळे केसांचा पोत खराब होऊ शकतो. कोंडा होणे, स्कॅल्पला खाज सुटणे, केस गळणे आणि टाळूच्या त्वचेची जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर केसांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या पाहून केसांची कशी काळजी घ्यावी तसेच कोणते प्रोडक्ट वापरावे, याचा सल्ला तज्ज्ञ तुम्हाला देतील.
(नक्की वाचा: वारंवार हेअर डाय केल्याने होतात हे 6 तोटे, पैसे वाया जातात शिवाय केसांचे होते मोठे नुकसान)
सल्फेट-फ्री शॅम्पू वापरा
पारंपरिक क्लीन्झर्सचा वापर केल्यास केसांना आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो आणि पीएच लेव्हलची पातळीही संतुलित राहण्यास मदत मिळते. ऑर्गन ऑइल किंवा कोरफड यासारख्या नैसर्गिक सामग्रींचा समावेश असणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा, ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या निर्माण होणार नाही. तसेच वारंवार केस धुऊ नये. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे टाळावे, कारण गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेलावर दुष्परिणाम होतात.
(नक्की वाचा : घनदाट-लांबसडक केसांसाठी तज्ज्ञांनी सांगितले मॅजिकल टॉनिक, काही मिनिटांत होईल तयार)
हेअर केअर रुटीन
डिप कंडिशनिंग मास्क वापरल्यास केमिकलमुळे केसांना आलेला कोरडेपणा दूर होईल आणि केस हायड्रेट होतील. केसांचे तुटणे टाळण्यासाठी वेणी किंवा आंबाडा यासारखी हेअरस्टाइल करावी. स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग, इस्त्रींच्या मदतीने केस सरळ करणे टाळा. दुष्परिणाम टाळण्यासाठी नेहमी उच्च दर्जाचे हीट प्रोटेक्टर्स वापरावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचे हेअर सीरम वापरावे.
ठराविक वेळानंतर केस ट्रिम करा
दुभंगलेल्या केसांची समस्या टाळण्यासाठी दर तीन महिन्यांनंतर केस ट्रिम करणे आवश्यक आहे. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहिल आणि केसांची चांगली वाढ देखील होईल.
कामाच्या निमित्ताने तुम्हाला वारंवार हेअर स्टाइल करणे आवश्यक असेल तर केसांचे नुकसान टाळण्यासाठी QR678 थेरपी देखील करू शकता.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.