योगासनं केल्यानंतर फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य देखील फिट राहते. बदलत्या जीवनशैलीत योगासनाचं महत्त्व सर्वांनाच पटलंय. त्यामुळे अनेक जण योगा शिकण्यासाठी खास क्लास लावतात. पण, वेळेच्या अभावी ते क्लास करणे सर्वांना शक्य होत नाही. विशेषत: महिलांना घर आणि करिअर सांभाळताना फिट राहण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरातील लवचिकता कमी होते. त्यांना वेगवेळे त्रास सुरु होतात. या महिलांच्या हलचालींवर स्वाभाविकच परिणाम होतो.
ही योगासनं केल्यानंतर संपूर्ण शरीराला फायदा होतो. त्याचबरोबर हाडं मजबूत होतात आणि शरीराचं संतुलनही चांगलं राहतं. महिलांनी रोज केलीच पाहिजेत अशी योगासनं कोणती आहेत हे पाहूयात....
महिलांसाठी योगासनं (Yoga Poses For Women)
बालासन
बालासनचा संपूर्ण शरीराला फायदा होतो. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते. हे आसन केल्यानं तणाव देखील कमी होतो. बालासन करण्यासाठी गुडघ्यावर बसा. त्यानंतर दोन्ही हात पुढं जमीनीवर ठेवा आणि पाठ वाकवून संपूर्ण शरीर पुढं घ्या. तुमचं डोकं जमीनीला चिकटलेलं असलं पाहिजे आणि गुडघे मुडपलेले हवे. पायाचे तळवे जमीनीवर हवेत. काही वेळ या आसनाच्या स्थितीमध्ये राहून नंतर पूर्ववत व्हा.
ताडासन
आपले पोश्चर नीट करण्यासाठी ताडासन (Tadasana) उपयोगी आहे. ताडासन करण्यासाठी दोन्ही पाय एकमेकांपासून साधरण दोन इंच दूर ठेवून उभे राहा. त्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांना जोडून हात उलटा करा. तो हात डोक्याच्या वर घ्या. पायाचे पंजे जमीनीला चिकटलेले असतील याची खबरदारी घ्या. तसंच अन्य शरीर वर खेचा. श्वास आत घ्या. ही स्थिती 10 सेकंद कायम ठेवा त्यानंतर श्वास घेऊन पूर्ववत व्हा.
विपरिता करणी योगा
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा मॅट किंवा चटई टाका.तुमचे दोन्ही हात आणि पाय जमिनीवर सरळ ठेवा. त्यानंतर हळू-हळू दोन्ही पाय वर करा आणि तुमचे शरीर जमिनीवर ठेवा.
दोन्ही पाय 90 अंशांच्या कोनात वर करा. डोळे बंद करुन थोडावेळ या स्थितीत रहा. त्यानंतर सावकाश पूर्ववत व्हा.
नवासन
महिलांसाठी नवासन (Navasana) हे फायदेशीर आसन आहे.नवासन करण्यासाठी जमिनीवर बसा. त्यानंतर शरीराचा वरचा भाग मागं करा आणि दोन्ही पाय वर करा. तुमच्या शरीर संतुलीत ठेवा. हात गुडघ्याच्या जवळ ठेवा. ही स्थिती 30 सेकंद कायम ठेवा आणि हळूहळू पूर्ववत व्हा.
सूचना : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यामधील कोणत्याही माहितीचे अनुकरण करण्यापूर्वी तुमचे डॉक्टर तसंच संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV मराठी या माहितीला जबाबदार असल्याचा दावा करत नाही.