Benefits of Jamun: उन्हाळा सुरू होताच पोषक तत्त्वांनी समृद्ध आणि चवीला आंबट-गोड असणारे जांभूळ बाजारात उपलब्ध होऊ लागतात. हे फळ केवळ चवदारच नाही, तर उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंडावाही देते. आयुर्वेदानुसार जांभूळ मधुमेहाच्या (डायबिटीज) रुग्णांसाठी आणि गरोदर महिलांसाठी फायदेशीर मानले जाते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ का फायदेशीर आहे?
बिहार सरकारच्या पर्यावरण, जल आणि वन विभागाने जांभूळ खाण्याच्या फायद्यांविषयी माहिती दिली आहे. या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जांभळाला मधुमेहाचा शत्रू म्हटले जाते. या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, जे रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर) स्थिर ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात जेव्हा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते, तेव्हा जांभळाचे नियमित सेवन केल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
Photo Credit: AI-Generated Image
प्रेग्नेंसीमध्ये जांभूळ खाण्याचे फायदे
गरोदर महिलांसाठी जांभूळ खाणे विशेष फलदायी ठरू शकते. जांभळामध्ये नैसर्गिक फॉलिक ॲसिडचे चांगले प्रमाण असते, जे गर्भातील बाळाच्या विकासासाठी आवश्यक असते.
(नक्की वाचा: जांभूळ खाल्ल्यास ब्लड शुगरवर काय परिणाम होतो? वाचा 5 मोठे फायदे, Jamunला English मध्ये काय म्हणतात?)
जांभूळ खाण्याचे फायदे
- आयुर्वेदात जांभूळ हे थंड आणि पित्तशामक फळ मानले गेले आहे. हे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते आणि पोटाला थंडावा देते.
- जांभळामध्ये फायबरचे भरपूर प्रमाण असते, जे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करून पोटाचे आरोग्य निरोगी ठेवते.
- जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे तत्त्व मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून शरीराचे संरक्षण करते.
- कमी कॅलरीज् असल्यामुळे या फळामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.
- जांभळातील पोटॅशिअममुळे रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित ठेवते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
- जांभूळ त्वचेची चमक वाढवण्यासाठीही गुणकारी आहे. उन्हाळ्यातील ऊन आणि घामामुळे प्रभावित झालेल्या त्वचेचे नुकसान भरून निघते.
जांभळाचे सेवन कसे करावे?
जांभळाच्या फळाव्यतिरिक्त त्याची पाने आणि फांद्यांचाही वापर केला जातो. आयुर्वेदात जांभळाची फांदी दात घासण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते, जी तोंडाचे आजार दूर करते. उन्हाळ्यात ताजी जांभळे खा, त्याचा ज्यूस करून प्या किंवा जांभळाचा सॅलडमध्ये समावेश करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)