BMC मध्ये कार्यकारी सहाय्यक पदाच्या भरतीत महत्त्वाचे बदल; 2 अटी रद्द, उमेदवारांना दिलासा 

सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation Job) ‘कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण' ही शैक्षणिक अर्हता लागू होती. त्यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द केली आहे. त्याचप्रमाणे, पदवी परीक्षेत 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '45 टक्के'  ही अट देखील रद्द करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, आता सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिरातीनुसार, 21 सप्टेंबर 2024 पासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील किंवा https://bit.ly/3XxQNli या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

नक्की वाचा - 3 लाखांचं कर्ज आणि मानधन; काय आहे विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क' मधील रु. 25,500-81,100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506 ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल. 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत 11 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात आला आहे.