उभ्या गाडीमध्ये एसी लावून झोपल्याने गाझियाबाद येथील एका ३० वर्षीय सॉफ्टवेयर इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेकांना धक्का बसला आहे. अनेकजण गाडी उभी करून त्यात एसी लावून झोपतात. त्यामुळे अखिलेश पुरोहित या ३० वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूने अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
उभ्या गाडीत एसी लावून झोपल्याने काय होतं?
उभ्या गाडीत एसी सुरू केल्याने इंजिन सुरू करावं लागतं. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल जळत राहते आणि वाहनाच्या एक्झॉस्ट पाईपमधून धूर बाहेर येत राहतो. या धुरात कार्बन मोनोऑक्साइड नावाचा एक अत्यंत घातक गॅस असतो. या गॅसला कोणताही रंग नसतो, कोणताही वासही नसतो. म्हणजे हा गॅस दिसत नाही आणि याचा वासही येत नाही. आता तुम्ही म्हणाल की, हा गॅस गाडीच्या टेलपाईपमधून बाहेर पडतो आणि लोक गाडीत बसलेले असतात, याशिवाय खिडक्या बंद ठेवतात. मग कुणाचाही गाडीतच मृत्यू कसा होऊ शकतो? एसी ब्लोअरमधून तर गॅस गाडीत शिरत नाही.
कार्बन मोनोऑक्साइड जीवघेणा असतो?
एसी थंड हवा आता फेकते आणि यामध्ये कोणतंही इंधन जळत नाही. त्यामुळे गॅस तयार होत नाही. मात्र एग्जॉस्ट पाइप आणि त्याच्या संपूर्ण यंत्रणेत लहान-मोठी गळती अनेकदा होते. जंग लागतो किंवा भोक पडतं. गाडी पार्क केलेली असताना कार्बन मोनोऑक्साइड आधीच बाहेर पडत असतो आणि गाडीखाली जमा होतो. एसीचा ब्लोअर किंवा हीटरचा पंखा हा बाहेरील हवा आत खेचून घेतो. गाडीच्या समोर विंडशील्डच्या खाली समोर हवा घेण्याचा इनटेक असतो. जेव्हा पंखा सुरू होतो तेव्हा गाडीच्या खालच्या भागातील हवा आत खेचून घेतो. आधीच गाडीच्या खाली कार्बन मोनोऑक्साइड गॅस असतो. एसीमध्ये एक रिसर्क्युलेट मोड असतो, ज्यात आतील हवा वारंवार फिरत राहते. ज्यामुळे बाहेरील नवी हवा कमी येते. मात्र जर कार्बन मोनोऑक्साइड आत घुसला तर तो गाडीच्या आत जमा होतो. गाडीच्या फ्लोअरवरील लहान छिद्रांमधून, गंजलेल्या भागांमधून, डोअर सील्समधून आणि बॉडीमधील विविध फटींमधून गॅस वाहनात शिरू शकतो.
झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरात काय होतं?
गॅस कुठूनही रस्ता शोधून आत शिरतो. त्याशिवाय गाडीमध्ये एसी सुरू असतो, त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीच्या श्वासातून गॅस फुप्फुसांमध्ये जातो आणि तेथून रक्तात पोहोचतो. रक्तात हिमोग्लोबिन असतं, हिमोग्लोबिन शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करीत असतं. मात्र कार्बन मोनोऑक्साइड हिमोग्लोबिनला घट्टपणे चिकटतो, ज्यामुळे ते ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही. रक्ताच्या माध्यमातून शरीरातील विविध अंगांपर्यंत ऑक्सिजन पोहोचतं. मात्र कार्बन मोनोऑक्साइड हिमोग्लोबिनला चिकटतं, त्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचणं कमी होतं, हृदयापर्यंत आणि शरीरातील विविध अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचणं कमी होतं.
झोपेत छातीत होते विषबाधा आणि मृत्यू ओढवतो...
ऑक्सिजनची कमतरता झाली तर श्वास जलद गतीने व्हायला हवा, झोपेतून व्यक्ती जागा व्हायला हवा, तो गाडीच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न का करीत नाही? यामागील कारण म्हणजे जेव्हा कार्बन मोनोऑक्साइड फुप्फुसांमधून रक्तात मिसळतो, तेव्हा ऑक्सिजन एकदम कमी होत नाही. हळूहळू एक प्रकारची नशा पसरू लागते. एखादी व्यक्ती जागी असेल तर तिलाही झोप येऊ लागते. मात्र एखादी व्यक्ती झोपेत असेल आणि त्यातही तिने दारू प्यायली असेल तर अधिक झिंग आल्यासारखं वाटतं. दारू प्यायलेली नसली तरीही झोपेत ऑक्सिजनची कमतरता असल्याचं लक्षात येत नाही. झोपेत असताना याची जाणीव होण्याऐवजी, अनेकदा शरीराला कोणताही इशारा मिळण्यापूर्वीच, वायूचा प्रभाव इतका वाढलेला असतो की व्यक्ती बेशुद्ध होते. हळूहळू मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्याने व्यक्ती गाढ झोपेत जाते. पुढे व्यक्ती बेशुद्ध होते आणि त्यातच हृदयाचं काम करणं बंद होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world