'चवीने खाणार त्याला देव देणार' अशी आपल्याकडे म्हण आहे. पण आता आपल्याकडे 'चवीने खाणार त्याला सेलिब्रिटी देणार' असं म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण अनेक मोठमोठे सेलिब्रिटी आता हॉटेल व्यवसायाकडे वळलेले आहेत. ह्यामध्ये मराठी अभिनेत्रींसह बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींचा समावेश आहे. फिटनेस फ्रिक असलेले क्रिकेटर्ससुद्धा ह्यात मागे नाहीत.
लोकांना चमचमीत आणि चविष्ट कसं खायला मिळेल याचा विचार करत आपल्या हॉटेलमध्ये काहीतरी हटके देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा हिचं मुंबईतील रेस्टॉरंट सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह तरुणांचं लक्ष वेधून घेत आहे. 'बॅस्टियन ऍट दि टॉप' या नावाने हे रेस्टॉरंट कोहिनुर दादर येथे सुरु करण्यात आलेले आहे. ह्याचं इंटिरियर देखणं आहे. जॅकलिन फर्नांडिस हिचं मुंबईतील 'पाली थाली' हे रेस्टॉरंट खवय्यांना तृप्त करत आहे. 'रु डू रिबान' नावाचं मुंबईतील आलिशान रेस्टॉरंट जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्या मालकीचं आहे. तर आयेशा टाकिया मुंबईत 'मद्रास डायरीज' नावाने रेस्टॉरंट चालवते जिथे तुम्हाला अस्सल दाक्षिणात्य पदार्थ चाखायला मिळतील. मराठी पाऊल पढते पुढे ह्या हॉटेल व्यवसायात मराठी अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. सुप्रिया पाठारे यांनी ठाण्यात 'महाराजा' हॉटेल सुरु केलेलं आहे. अनघा भगरे हिनेसुद्धा 'वदनी कवळ घेता' नावाने हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलेलं आहे. अभिनेत्री श्रेया बुगडे हिने अस्सल 'मत्स्याहारी' खवय्यांसाठी 'दि बिग फिश अँड कंपनी' नावाने सुरु केलेलं रेस्टॉरंट खवय्यांना तृप्त करत आहे. एरव्ही फिटनेस फ्रिक असणारे क्रिकेटर्ससुद्धा आपल्या चाहत्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना दिसतात. विराट कोहलीचं 'वन एट कम्युन' मुंबई, पुणे, दिल्लीसह कोलकत्यामधील खवय्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. सोबतच महेंद्र सिंग धोनी याचं बँगलोरला असलेलं 'शाका हॅरी' , रवींद्र जडेजाचं 'जड्डूज फूड फिल्ड', शिखर धवनचं 'दि फ्लायिंग कॅच', सुरेश रैनाचं 'रैना इंडियन रेस्टॉरंट', कपिल देव यांचं 'कपिल देव्हज इलेव्हन' ही रेस्टॉरंटसुद्धा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर एखादा सेलिब्रिटी तुम्हाला जेवण वाढायला किंवा जेवणाच्या चवीबद्दल चौकशी करायला आला तर आश्चर्य वाटायला नको.