जाहिरात

मुलांना 'या' 7 गोष्टी खोट्या बोलायला शिकवा; पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या तज्ज्ञांनी पालकांना का दिलाय हा सल्ला?

Child Safety Tips: आजच्या बदलत्या आणि अनपेक्षित काळात मुलांच्या सुरक्षेसाठी कधीकधी काही गोष्टी खोट्या बोलणे अत्यंत आवश्यक बनले आहे. 

मुलांना 'या' 7 गोष्टी खोट्या बोलायला शिकवा; पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या तज्ज्ञांनी पालकांना का दिलाय हा सल्ला?
Child Safety Tips: मुलांच्या सुरक्षेसाठी कधीकधी काही गोष्टी खोट्या बोलणे अत्यंत आवश्यक आहे.
मुंबई:

Child Safety Tips: आपल्याकडे लहानपणापासूनच मुलांना नेहमी खरे बोलण्याची शिकवण दिली जाते. खोटे बोलणे पाप आहे, असे आपण त्यांना सांगतो. पालकांची ही शिकवण अगदी योग्य असली तरी आजच्या बदलत्या आणि अनपेक्षित काळात मुलांच्या सुरक्षेसाठी कधीकधी काही गोष्टी खोट्या बोलणे अत्यंत आवश्यक बनले आहे. 

सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलांनी अशा काही गोष्टी खोट्या सांगणे आवश्यक आहे. विशेषत: मुले जेव्हा शाळेत जातात, पार्कमध्ये खेळतात किंवा घराबाहेर एकटी असतात, तेव्हा त्यांची सुरक्षा ही पालकांसाठी सर्वात मोठी चिंता असते. याच पार्श्वभूमीवर, पोलीस ट्रेनिंग सेंटरला आपल्या सेवा देणाऱ्या एका तज्ज्ञ व्यक्तीने पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांनी मुलांच्या सुरक्षेसाठी अशा 7 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक माता-पित्याने आपल्या मुलांना लहानपणापासूनच खोट्या बोलायला शिकवल्या पाहिजेत. या छोट्याशा गोष्टी मुलांना मोठ्या संकटातून वाचवू शकतात.

घर सुरक्षित ठेवण्यासाठी 'हे' खोटे बोलायला शिकवा

जेव्हा मुले घरात एकटी असतात, तेव्हा अनेकदा अनोळखी व्यक्ती दारावर येतात. अशा वेळी जर दारावर आलेल्या अनोळखी व्यक्तीने विचारले की, मम्मी-पापा घरात आहेत का? तर मुलांनी कधीही आपण घरात एकटे असल्याचे सांगू नये. मुलांनी 'आई-बाबा घरातच आहेत आणि ते सध्या व्यस्त आहेत' असे खोटे उत्तर दिले पाहिजे. यामुळे चुकीच्या हेतूने आलेल्या लोकांचे मनसुबे अपयशी ठरतात आणि मुले सुरक्षित राहतात.

( नक्की वाचा : Weight Loss: 101 किलोवरून थेट 65 वर; 7 महिन्यांत 36 किलो वजन कमी करण्याचं तरुणीनं सांगितलं गुपित )

कोणाकडूनही लिफ्ट न घेण्याचा नियम

शाळेतून किंवा क्लासवरून घरी येताना अनेकदा अनोळखी व्यक्ती कार किंवा बाईकवरून लिफ्ट देण्याची ऑफर देतात. अशा वेळी मुलांनी लगेच नकार दिला पाहिजे. त्या व्यक्तीपासून दूर जात मुलांनी 'माझे आई-बाबा मला घेण्यासाठी  येत आहेत' असे खोटे सांगितले पाहिजे. या एका खोट्यामुळे मुले अनोळखी लोकांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतात.

मिठाई, चॉकलेट किंवा खेळण्यांचे आमिष

काही लोक लहान मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी चॉकलेट, खेळणी किंवा खाण्याच्या वस्तूंचे आमिष दाखवतात. अशा परिस्थितीमध्ये मुलांनी त्या वस्तूंना स्पष्ट नकार दिला पाहिजे. तसेच 'माझे आई-बाबा अगदी जवळच उभे आहेत' असे उत्तर देऊन तिथून बाजूला झाले पाहिजे.

( नक्की वाचा : Cancer Alert: फक्त 3 सवयी बदला आणि कॅन्सरचा धोका 50% कमी! डॉक्टरांनी सांगितलेला 'हा' फॉर्म्युला नक्की काय आहे? )
 

पालकांपासून कोणतीही गोष्ट न लपवण्याची सवय

 एखाद्या अनोळखी किंवा परिचयाच्या व्यक्तीने मुलाला म्हटले की, 'ही गोष्ट तुझ्या आई-बाबांना सांगू नको', तर हा धोक्याचा इशारा आहे. हे मुलांना पालकांनी समजावून सांगावे.  मुलांनी ती गोष्ट लपवण्याऐवजी घरात जाऊन सर्वात आधी आपल्या पालकांना संपूर्ण हकीकत सांगितली पाहिजे.

खासगी माहिती शेअर न करणे

आपल्या घरचा पत्ता, ळेचे नाव, आई-वडिलांचा मोबाईल नंबर किंवा कुटुंबाची कोणतीही महत्त्वाची माहिती अनोळखी व्यक्तीला न देण्याची सवय मुलांना लावा. कुणी अशी माहिती ती विचारण्याचा प्रयत्न केला, तर मुलांनी आपल्याला काहीही माहीत नाही असे सांगून स्पष्ट नकार द्यावा. 

रस्ता चुकल्यास कुणाची मदत घ्यावी

जर एखादे मूल गर्दीच्या ठिकाणी रस्ता भटकले किंवा हरवले, तर त्याने घाबरून न जाता योग्य व्यक्तीकडे मदत मागितली पाहिजे. अशा वेळी मुलांनी तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे, सुरक्षा रक्षकाकडे किंवा तिथे उपस्थित असलेल्या एखाद्या महिला किंवा कुटुंबाकडे जाऊन मदत मागणे आवश्यक आहे. 

धोका जाणवताच मोठ्याने ओरडणे

 एखाद्या मुलाला असे वाटले की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे किंवा त्याला जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न करत आहे, तर मुलाने शांत न बसता जोराजोराने ओरडले पाहिजे. मोठ्याने आवाज करून आसपासच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे आणि लगेचच एखाद्या सुरक्षित जागेच्या दिशेने धाव घ्यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com