जर तुम्ही भारतात रात्री ९ ते १० या वेळेत रस्त्यावरून प्रवास करत असाल, तर तुम्ही दिवसातील सर्वात धोकादायक वेळेत प्रवास करत आहात. 'झुनो जनरल इन्शुरन्स'ने जारी केलेल्या व्यापक आणि विस्तृत 'इंडिया रोड सेफ्टी रिपोर्ट 2026' (IRSR) मधून ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, रात्री 8 वाजल्यानंतर वाहन चालकांच्या 'ड्रायव्हिंग स्कोअर'मध्ये झपाट्याने घसरण होते. ज्यामुळे दुपारच्या वेळेच्या तुलनेत रात्रीचा प्रवास लक्षणीयरीत्या अधिक धोकादायक बनतो. याउलट, रस्ते प्रवासासाठी दिवसातील सर्वात सुरक्षित वेळ ही दुपारची 1 ते 2 अशी नोंदवली गेली आहे.
हा अहवाल 'झुनो स्मार्टड्राइव्ह' (Zuno SmartDrive) अॅपच्या टेलिमेट्री डेटावरून देशातील 17 राज्यांमधील तब्बल 45 लाख ट्रिप्स आणि 5.5 कोटी किलोमीटर अंतराच्या ड्रायव्हिंग पॅटर्नचे विश्लेषण करून तयार करण्यात आला आहे. रस्ते अपघातांचा धोका हा केवळ भौगोलिक किंवा लोकसंख्येच्या आकडेवारीवर नसून आपण वाहन कसे चालवतो यावर 80% पेक्षा जास्त अवलंबून असतो, हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
(नक्की वाचा- Mumbai Rain: मुंबईतून पाऊस गायब! नागरिकांचं टेन्शन वाढलं; पुन्हा कधी बरसणार? हवामान विभागाने दिली माहिती)
महिला की पुरुष? कुणाची ड्रायव्हिंग चांगली?
वाहन चालवण्याच्या बाबतीत समाजात असलेल्या जुन्या रूढीवादी विचारांना या अहवालातील आकडेवारीने पूर्णपणे खोडून काढले आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगच्या बाबतीत महिला आणि पुरुष चालकांमध्ये कोणताही मोठा फरक आढळलेला नाही.
- महिला चालकांचा सरासरी ड्रायव्हिंग स्कोअर: 92.86 टक्के
- पुरुष चालकांचा सरासरी ड्रायव्हिंग स्कोअर: 92.43 टक्के
भारतीय चालकांच्या मुख्य चुका
या अभ्यासानुसार, भारतीय वाहन चालकांच्या दोन सर्वात कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. चानक ब्रेक लावणे याचा स्कोअर सर्वात कमी म्हणजे 87 नोंदवला गेला. तर अतिवेगाने अचानक प्रवेग वाढवणे याचा स्कोअर 91 आहे. पावसाळा किंवा हिवाळ्यातील धुके यांसारख्या बदलत्या ऋतूंचा चालकांच्या एकूण ड्रायव्हिंग स्कोअरवर वर्षभर कोणताही विशेष परिणाम दिसून आला नाही.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: केतनला ढकलल्यानंतर सियाचे पहिले शब्द काय होते? गडावरील सुरक्षारक्षकाने सांगितलं...)
भारतीय रस्ते सुरक्षेचे भीषण वास्तव आणि आर्थिक फटका
'IRSR 2026' चा हा डेटा अशा वेळी आला आहे, जेव्हा भारत रस्ते अपघातांच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या अहवालातील काही प्रमुख आणि चिंताजनक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
- वार्षिक रस्ते अपघात मृत्यू- 1.73 लाख
- जागतिक मृत्यूसंख्येतील भारताचा वाटा - 11 टक्के
- देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणारा फटका - जीडीपीच्या एकूण 3-5 टक्के
- दोन चाकी वाहन चालकांचा मृत्यूंमधील वाटा - 44 टक्के
- पादचाऱ्यांचा (Pedestrians) मृत्यूंमधील वाटा - 19 टक्के
2030 पर्यंतचे लक्ष्य आणि तंत्रज्ञानाची गरज
स्टॉकहोम घोषणेनुसार भारताने 2030 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण 50% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर झुनोच्या एमडी आणि सीईओ शनाई घोष यांनी सांगितले की, केवळ पायाभूत सुविधा किंवा चांगले रस्ते बांधणे पुरेसे नाही. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने चालकांच्या वर्तनात आणि मानसिकतेत बदल घडवून आणणे हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे.