Drinking Water in the Moring : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते पण ही सवय तुमच्यासाठी घातकही ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायलं नाही तर फायद्याऐवजी नुकसान सोसावे लागू शकते. आजकाल सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यातून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावर तर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकतं.
सकाळी जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम
१. पचनशक्तीवर परिणाम - सकाळी आपली पचनशक्ती मंद असते. अशा वेळी एकदम भरपूर पाणी प्यायल्याने ती अधिक मंदावते. त्यानंतर आपण जो नाश्ता करतो तो नीट पचण्याऐवजी पोटात सडू लागतो.
२. बद्धकोष्ठता - अन्न नीट न पचल्यामुळे शरीरात टॉक्सिन्स वाढू लागतात. परिणामी शरीराला अन्नातून पोषण मिळत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो.
३. शारीरिक जडत्व - सकाळी जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे पोटात जडपणा जाणवतो आणि भूक कमी लागते. काही लोकांना रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो.
पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
आयुर्वेदानुसार, आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार आणि तहान लागेल त्यानुसार पाणी प्यावं. सकाळी उठल्याबरोबर एकदम १ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करू नका. सकाळी नेहमी कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. तेही एकाच वेळी न पिता थोडं थोडं करून प्यावं. पाणी नेहमी आरामात बसून आणि घोट घोट करून प्यावं. उभं राहून पाणी प्यायल्याने पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते, पण हिवाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे टाळावे. पाण्याचे सेवनही प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. अतिरेकीपणा शरीराला अपायकारक ठरू शकतो.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )