अनेकांना असं वाटतं की, सुट्टीच्या दिवशी किंवा आठवड्यातून एकदा दारू प्यायल्याने आरोग्याला फार त्रास होत नाही. मात्र नुकत्याच एका अभ्यासामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दारूमुळे उद्धवणारी जोखीम केवळ अधिक प्रमाणात पिणाऱ्यांमध्येच नाही तर कमी प्रमाणात पिणाऱ्यांनाही याचा धोका असतो. अशात दारूचं सुरक्षित प्रमाण किती असतं असा सवाल विचारला जात आहे.
कमी प्रमाणात घेतलेली दारू आरोग्यासाठी फायदेशीर?
अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी वाईन पिणं योग्य असल्याचं मानतात. १९२४ मध्ये अमेरिकन जीवशास्त्रज्ञ रेमंड पर्ल यांनी एका अभ्यासात सांगितलं होतं की, कमी प्रमाणात दारू पिणाऱ्यांचा मृत्यूदर कमी दारू पिणारे किंवा न पिणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतो. याच्या आधारावर बराच काळापर्यंत कमी दारू आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं मानलं जात होतं. मात्र नंतर तज्ज्ञांच्या अभ्यासात यात कमतरता असल्याचं समोर आलं. अनेक अभ्यासांमध्ये, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मद्यपान सोडलेल्या लोकांचाही ‘मद्यपान न करणाऱ्या' गटात समावेश करण्यात आला होता.
अमेरिकेच्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी मद्यपान आणि आरोग्य यावरील ७,००० हून अधिक अभ्यासांची समीक्षा केली. यावरुन हे सिद्ध झालं नाही की, कमी प्रमाणात मद्यपान करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दारूचं कोणतंही प्रमाण आरोग्यासाठी फायदेशीर नाही?
अभ्यासानुसार, दारूचं प्रमाण वाढलं की जोखीमही वाढते. आठवड्यात तब्बल ७ ड्रिंक्स घेतल्यास आयुष्यभरात दारूशी संबंधित मृत्यूचा जोखीम साधारण एक हजारात एक मानला गेला. ही जोखीम ८ ते ९ ड्रिंक्स प्रति आठवड्याने वाढून १०० मध्ये एक आणि १४ ड्रिंक प्रति आठवडा असेल तर जवळपास २५ मध्ये एकपर्यंत पोहोचू शकतो.
नक्की वाचा - वाईन शॉपवाले बक्कळ कमाई करतात? सत्य वेगळंच; महिन्याची कमाई पाहून धक्काच बसेल!
पिण्याची पद्धतही महत्त्वाची...
विशेषतज्ज्ञांनुसार, एकूण प्रमाणच नाही तर दारू पिण्याची पद्धतही महत्त्वपूर्ण आहे. जर कोणी व्यक्त आठवडाभर दारू पित नाही, मात्र विकेंडमध्ये एकाच वेळी अनेक ड्रिंक्स घेत असेल तर त्यामुळे दुखापती, रस्ते अपघात, अल्कोहोल विषबाधा, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
२०० हून अधिक आजारांचा धोका...
दारूचा फटका केवळ लिव्हरलाच (यकृत) होत नाही तर यामुळे २०० हून अधिक आजारांचा धोका असतो. यामध्ये स्तन, लिव्हर, तोंड, घसा आणि अन्ननलिकेचा कॅन्सर, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयासंबंधित आजार, सिरोसिस, स्वादुपिंडाचा दाह आणि रस्ते अपघातांचा समावेश आहे. याचा अर्थ दारू पिणारी प्रत्येक व्यक्ती आजारी होईल असं नाही. मात्र दारू पिणं जितकं कमी, त्याच्याशी संबंधिक आरोग्याची जोखीमही तितकीच कमी असू शकते.
( Disclaimer : वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)