Homemade Mosquito Spray: पावसाळा सुरू झाला की घरात डासांची फौज शिरते आणि डेंग्यू-मलेरियाचा धोका थेट दाराशी येऊन उभा ठाकतो. अशा वेळी आपण लगेच बाजारातून कॉइल किंवा ऑलआउटसारखी लिक्विड औषधे विकत आणतो. पण थांब, ही केमिकलची औषधं डासांना मारत असली तरी आपल्या फुप्फुसांची वाट लावतात! विशेषतः घरात छोटी मुलं असतील तर हा धूर खूप घातक ठरतो. त्यामुळे बाजारातले हे केमिकल बाजूला ठेवा आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटांत घरातल्या घरात डासांना पळवून लावणारे एकदम भारी, सोपे आणि सुरक्षित औषधं कसे बनवायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कापूर आणि नारळ तेलाचा नैसर्गिक रिफिल
घरातली जुनी मॉस्किटो रिफिलची बाटली फेकून न देता ती स्वच्छ करा. त्यात 8 कापूर गोळ्यांचा चुरा करून टाका आणि वरून नारळाचे तेल भरा. हे रिफिल नेहमीसारखे मशीनमध्ये लावा. कापुराच्या मस्त सुगंधाने घर तर सुगंधी होईलच, पण एकही डास घरात फिरकणार नाही. बाटली नसेल तर हे लिक्विड एका छोट्या बाटलीत भरून, झाकणाला छिद्र पाडून कापडी वात लावा आणि दिव्यासारखे पेटवा. याच्या वासाने घरातील सर्व डास पळून जातील.
( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )
कापूर, कडुनिंब आणि लवंगांचा सोपा उपाय
डासांना पळवण्यासाठी कापूर आणि कडुनिंबाच्या तेलाचा धूर हा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. याशिवाय लिंबू अर्धे कापून त्यात 4 ते 5 लवंगा खोचून खोलीत ठेवल्यास डास जवळ येत नाहीत. मोहरीच्या तेलात लवंग जाळणे हासुद्धा एक उत्तम आणि केमिकल्समुक्त पर्याय आहे.
कांदा, लसूण आणि लाल तिखटाचा ऑलआउट स्प्रे
घराच्या कोपऱ्यांमध्ये मारण्यासाठी एक कडक स्प्रे तयार करता येतो. यासाठी 1 लहान कांदा आणि 1 लसणाची पाकळी बारीक चिरा. त्यात 4 कप पाणी, 4 मोठे चमचे लाल तिखट आणि 1 मोठा चमचा भांडी धुण्याचे लिक्विड सोप मिसळा. हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. हा स्प्रे अंगावर न लावता टेबल, खुर्च्यांखाली किंवा घरातील काळोख्या कोपऱ्यांमध्ये मारा. हा एक स्प्रे साधारण 1 आठवडा सहज टिकतो.
त्वचेवर लावण्यासाठी घरगुती लोशन
डास चावू नयेत म्हणून अंगावर लावायचे लोशनही घरी बनवता येते. यासाठी 1/4 कप सफरचंदाचे व्हिनेगर, 1/4 कप विच हेजल आणि रोझमेरी, लेमनग्रास किंवा नीलगिरी यांपैकी कोणत्याही तेलाचे 20 थेंब एकत्र करा. हे लिक्विड स्प्रे बाटलीत भरून ठेवा आणि बाहेर पडण्यापूर्वी अंगावर थोडे शिंपडून घ्या. डास तुमच्या जवळ फिरकणार नाहीत.
( नक्की वाचा : Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा! )
पेपरमिंट आणि नीलगिरी तेलाची जादू
लिंबू नीलगिरीचे तेल आणि पुदिना यांचा वास डासांना अजिबात सहन होत नाही. 1 कप पाण्यात पेपरमिंट तेलाचे काही थेंब टाकून ते चांगले हलवा आणि हाता-पायांवर स्प्रे करा. यामुळे डास तुमच्यापासून कायम दूर राहतील.