भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून विजेतेपद पटकावल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. या विजयामुळे सोशल मीडियावर देखील फन्स रिअॅक्ट होत आहेत. दरम्यान X या प्लॅटफॉर्मवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेटकरी 'X' वर पोस्ट करत आहेत की, "भारताने विजय मिळवल्यानंतर एलॉन मस्कने लाईक बटन बदलले आहे, प्रयत्न करून पाहा", असे मेसेज पोस्ट केले जात आहेत. यामुळे अनेक युजर्स 'X' चे लाईक बटन खरोखर बदलले आहे की नाही, हे तपासू लागले आहेत.
लाईक बटण खरंच बदललं आहे का?
या व्हायरल दाव्याची सत्यता तपासल्यास, असे दिसून येते की, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक बटणाचा आकार बदललेला नाही. 'X' वरील 'लाईक' बटन आजही त्याच 'हार्ट' किंवा हृदयाच्या आकारात आहे, जे मागील अनेक वर्षांपासून वापरले जात आहे. भारतीय संघाने आशिया कप 2025 जिंकल्यानंतर एलॉन मस्कने X च्या कोणत्याही फिचरमध्ये किंवा बटणाच्या आकारात तात्काळ कोणताही बदल केलेला नाही. अनेकदा मोठे इव्हेंट पोस्टवर लाईक्स मिळवण्यासाठी अशा ट्रिक्स वापरल्या जातात. त्याचाच हा भाग असल्याचं दिसून येत आहे.
तिलक वर्माची निर्णायक खेळी
रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून आशिया कपचे विजेतेपद पटकावले. आशिया कपच्या इतिहासात भारताने आशियाई विजेता होण्याचा मान मिळवण्याची ही नववी वेळ होती. तिलक वर्मा या सामन्याचा हिरो ठरला. तिलक वर्माने 53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 69 धावांची निर्णायक खेळी करून पाकिस्तानवर विजय मिळवला.