Hypertension Symptoms: हल्ली मोठ्या प्रमाणावर एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केले जाते. तास-न्-तास मोबाइल, लॅपटॉप आणि स्क्रीनसमोर वेळ घालवतात तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील ताणतणावाचा सामना करतात. सुरुवातीला या सवयी सामान्य वाटत असल्या तरी कालांतराने त्या उच्च रक्तदाब वाढवून हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग आणि ध्यानाच्या मदतीने ताण कमी करणे, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सध्या उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः एनर्जी ड्रिंक्सचे वाढते सेवन हृदयावर दुष्परिणाम करत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
कॅफिन, साखर आणि अपुऱ्या झोपेचे हृदयावर घातक परिणाम | Fatal Effects of Caffeine, Sugar, and Inadequate Sleep on Heart
मुंबईतील कार्डिओव्हॅस्कुलर सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे म्हणाले, "एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन, साखर आणि उत्तेजक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे काही काळासाठी हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढू शकतो. पण असे ड्रिंक्स अति प्रमाणात प्यायले तर हृदय आणि रक्तवाहिन्यांवर ताण येतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच उच्च रक्तदाब, ताणतणाव किंवा हृदयविकारचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर ठरू शकतो. अपुरी झोप आणि ताणतणाव यासोबत एनर्जी ड्रिंक्स घेतल्यास त्याचे दुष्परिणाम अधिक वाढतात. तसेच लॅपटॉपवर काम करणे, सतत मोबाइलचा वापर करणे किंवा रात्री उशीरापर्यंत स्क्रीनचा वापर करणे यामुळे झोपेची गुणवत्ता, शारीरिक हालचाल आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ताणतणाव हा जीवनाचा भाग असला तरी तो हृदयावर विपरीत परिणाम करू शकतो".
तरुणांमध्ये वाढती लक्षणे आणि उच्च रक्तदाबाचे धोके | Rising Symptoms in Youth and Hidden Dangers of Hypertension
डॉ. बिपीनचंद्र भामरे पुढे म्हणाले, दर आठवड्याला 25 ते 45 वयोगटातील 3 ते 4 रुग्ण उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके, छातीत अस्वस्थता आणि हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांसह येत आहेत. थकवा येणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, शारीरिक क्षमता कमी होणे, डोकेदुखी आणि वाढता ताणतणाव तसेच व्यायामावेळी छातीत जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात.
त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी एनर्जी ड्रिंक्सचा वाढता वापर, मोबाइल आणि लॅपटॉपचा अतिवापर आणि वाढत्या स्पर्धेमुळे वाढणारा ताणतणाव यामुळे हृदय तसेच रक्तवाहिनीसंबंधी प्रणालीवर ताण येत आहे. नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदय निकामी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण करतात.
(नक्की वाचा : Excessive Sweating Causes: उन्हाळ्यात जास्त घाम येतोय? थकवाही जाणवतोय? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाच डॉ. पै यांनी दिलेली माहिती)
अनेक वेळा उच्च रक्तदाब कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढतो, त्यामुळे वेळीच हृदय तपासणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एनर्जी ड्रिंक्स पिणे टाळावे आणि विशेषतः झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करावा. नियमित व्यायाम, तणावावर नियंत्रण ठेवणे , संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित रक्तदाब तपासणीने हृदयाचे संरक्षण करता येते.

Photo Credit: NDTV Marathi
हृदयाच्या संरक्षणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा मोलाचा सल्ला | Expert Doctors Advice for Heart Protectionराहुल गुप्ता (संचालक - हृदयरोगतज्ञ, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेल) म्हणाले की,"सध्या हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे. व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारासोबतच एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन, ताणतणाव आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे यामुळे हृदयाचे नुकसान होते. दर आठवड्याला २५ ते ४५ वयोगटातील एक ते दोन रुग्ण उच्च रक्तदाब आणि हृदयाची गती वाढणे अशा तक्रारी घेऊन येत आहेत. भविष्यात या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो. एनर्जी ड्रिंक्सचे सेवन टाळणे, स्क्रीनटाइम कमी करणे, मेडिटेशन करुन ताण कमी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब तपासणी करणे यामुळे हृदयाचे संरक्षण होऊ शकते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world