EPFO New Portal: जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अनेक नोकऱ्या बदलल्या असतील आणि जुन्या पीएफ खात्यांमधील (PF Accounts) पैसे ट्रान्सफर करायचे विसरला असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक नवीन डिजिटल ई-पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने ईपीएफ सदस्य त्यांची जुन्या, दावा न केलेल्या किंवा अॅक्टिव्ह नसलेल्या पीएफ खात्यांचा ट्रॅक ठेवू शकतील आणि अधिकृत ओळख पडताळणीद्वारे (Authentication) त्या खात्यांमधील पैसे सध्याच्या सक्रिय युनिव्हर्सल अकाउंट नंबरमध्ये (UAN) ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतील. लोकसभेत खासदार व्ही. के. श्रीकंदन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी या नवीन सुविधेची अधिकृत घोषणा केली.
नवीन ई-पोर्टलमुळे EPF सदस्यांना कोणते फायदे मिळतील?
केंद्र सरकार आणि श्रम मंत्रालयाच्या माहितीनुसार, कागदोपत्री कामे आणि ईपीएफओ कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती संपवणे हा या नवीन प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. ही वेबसाइट युजर-फ्रेंडली बनवण्यात आली आहे. हे पोर्टल आल्यामुळे ईपीएफ सदस्यांना आता ईपीएफओ कार्यालयात न जाता घरबसल्या खालील कामे करता येतील:
- जुन्या आणि बंद पडलेल्या खात्यांची ओळख पटवणे आता शक्य होईल.
- जुन्या खात्यांमधील क्षिल्लक रक्कम (बॅलन्स) थेट आपल्या नवीन UAN मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी किंवा सेटलमेंटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय मिळेल.
- पोर्टलवर 'नो युअर कस्टमर' (KYC) अपडेट करण्यासाठी 'जॉइंट डिक्लेरेशन' (Joint Declaration) देखील ऑनलाइन सादर करता येईल.
- डिजिटल प्रमाणीकरणामुळे पडताळणी वेगाने होईल, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि फसवणुकीची शक्यता संपुष्टात येईल.
जुन्या पीएफ खात्याचा नंबर पूर्णपणे विसरला असल्यास मदत मिळेल का?
संसदेत दिलेल्या माहितीनुसार, ज्या सदस्यांकडे जुन्या पीएफ खात्याचा तपशील किंवा ओळख उपलब्ध आहे, हे पोर्टल अशा सदस्यांना मदत करेल. पण ज्या सदस्यांकडे त्यांच्या जुन्या पीएफ खात्याचा कोणताही नंबर किंवा तपशील नाही आणि ते ते पूर्णपणे विसरले आहेत, त्यांच्यासाठी सध्या असा कोणताही नवीन प्रस्ताव विचाराधीन नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे.
(नक्की वाचा: वाहनधारकांच्या खिशाला बसणार कात्री! 4 वर्षानंतर महागणार गाड्यांचा विमा? IRDAIकडे विमा कंपन्यांची ही मोठी मागणी)
या नवीन पोर्टलची गरज का भासली?
भारतात 8 कोटींहून अधिक ईपीएफ सदस्य आहेत. वर्ष 2014 मध्ये UAN (Universal Account Number) प्रणाली लागू होण्यापूर्वी, जेव्हा जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलायचा, तेव्हा त्याला नवीन पीएफ खाते क्रमांक दिला जायचा. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या जुन्या खात्यांमधील पैसे दावा न करता तसेच पडून राहिले. आता हे नवीन पोर्टल सदस्यांना कोणत्याही त्रासाशिवाय त्यांच्या आयुष्यभराची कष्टाची कमाई परत मिळवण्यास मदत करेल.
या नवीन सुविधेसोबतच ईपीएफओने (EPFO) आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेला 8.25 टक्के वार्षिक व्याजदर सदस्यांच्या खात्यात जमा करण्यासही सुरुवात केली आहे. खात्यात व्याजाची रक्कम जमा झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे (SMS) मेसेज पाठवले जात आहेत, ज्यामुळे नोकरदार वर्गाला त्यांच्या निवृत्तीच्या बचतीवर (Retirement Savings) दुहेरी फायदा मिळत आहे.