जाहिरात

सावली, भास... तुमच्या रुममध्ये कुणीतरी आहे? भूत की अजून काही; जाणून घ्या सविस्तर

बंद खोलीत किंवा शांततेत असताना 'आपल्याकडे कोणीतरी पाहत आहे' किंवा 'मागे कोणीतरी उभे आहे' असा भास अनेकदा लोकांना होतो. लोक या अनुभवाला भूत-प्रेत किंवा अलौकिक शक्तींशी जोडतात.

सावली, भास... तुमच्या रुममध्ये कुणीतरी आहे? भूत की अजून काही; जाणून घ्या सविस्तर

रात्रीची वेळ, बंद खोली, चहूबाजूंनी पसरलेली शांतता आणि अचानक असं वाटणं की, तुम्हाला कोणीतरी पाहतंय... तुम्हीही कधी असा अनुभव घेतला आहे का? अनेक लोकांना अनेकदा आपल्या मागे कोणीतरी उभे असल्याचा किंवा खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी असल्याचा तीव्र भास होतो. 

सर्वसामान्यपणे अशा अनुभवांना भूत-प्रेत, वाईट शक्ती किंवा अलौकिक गोष्टींशी जोडले जाते. परंतु, या भीतीमागे कोणतीही भुताटकी नसून आपल्या मेंदू आणि शरीराचे एक मोठे वैज्ञानिक कारण दडलेले असते. मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या मदतीने या गूढ अनुभवामागील पडदा आता उठला आहे. मेंदू नेमका कसा खेळ करतो, ते सविस्तर जाणून घेऊया.

असा भास का होतो? 

जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकांतात कोणाच्या तरी असण्याचा भास होतो, तेव्हा त्याला वैद्यकीय भाषेत आणि मानसशास्त्रात काही विशिष्ट कारणांनी स्पष्ट केले जाते.

अतिताण आणि 'कोर्टिसोल' हार्मोनचा खेळ

तणावाचा परिणाम केवळ आपल्या मूडवरच होत नाही, तर तो आपल्या विचार करण्याच्या आणि अनुभवण्याच्या क्षमतेवरही होतो. जेव्हा माणूस तीव्र मानसिक तणावाखाली असतो, तेव्हा शरीरात 'कोर्टिसोल' (Cortisol) नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी झपाट्याने वाढते. हा हार्मोन मेंदूला प्रत्येक क्षणी 'अलर्ट' राहण्याचा सिग्नल देतो.

काय आहे 'हायपरविजिलेंस'?

मानसशास्त्रानुसार, तणावामुळे मेंदू 'हायपरविजिलेंस' (Hypervigilance) नावाच्या स्थितीत जातो. या स्थितीत माणूस आपल्या आसपासच्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरही गरजेपेक्षा जास्त लक्ष देऊ लागतो. अशा वेळी पंख्याचा मंद आवाज, खिडकीची हालचाल किंवा पडद्याची सावली यामुळेही मनात तीव्र भीती आणि भ्रम निर्माण होऊ लागतात.

झोपेची कमतरता 

आजच्या डिजिटल युगात उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, कामाचा ताण आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांची झोप अपूर्ण राहत आहे. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक सतत कमी झोप घेतात, त्यांना असे अजब आणि भीतीदायक अनुभव येण्याची शक्यता कैक पटीने वाढते. जेव्हा मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही, तेव्हा तो बाहेरील माहितीवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. परिणामी, डोळ्यांसमोर अचानक सावल्या दिसणे किंवा खोलीत कोणाची तरी उपस्थिती जाणवणे असे भ्रम होतात.

अशी भीती वाटल्यास काय करावे? 

पुरेशी झोप घ्या : मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी दररोज किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे अनिवार्य आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळावा.
तणाव व्यवस्थापन : कामाचा किंवा वैयक्तिक आयुष्यातील ताण कमी करण्यासाठी ध्यान (Meditation), योगासने किंवा छंदांना वेळ द्या. यामुळे कोर्टिसोल हार्मोन नियंत्रित राहतो.
जीवनशैलीत बदल : आपल्या रोजच्या दिनचर्येत सकारात्मक बदल करा. सकस आहार घ्या आणि कॅफिन (चहा/कॉफी) चे प्रमाण मर्यादित ठेवा.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या: जर हे भ्रम किंवा भीती प्रमाणाबाहेर वाढत असेल आणि त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर त्वरित मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात उत्तम ठरते.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com