Ganesh Chaturthi 2025 Puja Vidhi: कोणत्याही कामाचा शुभारंभ करताना गणपती देवतेची पूजा केली जाते. गणरायाची पूजा तुम्ही कधीही आणि कोणत्याही वेळेस करू शकता. पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथील गणपतीची विधीवत पूजा करणं फलदायी मानले जाते. म्हणून भाविक जल्लोषात बाप्पाला घरी आणतात आणि पूजा करुन मूर्तीची स्थापना करतात. तुम्ही देखील घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार आहात का? तर गणेश पूजनाची विधी आणि त्यासंदर्भातील सर्व नियम जाणून घ्या.
घरामध्ये गणेश मूर्ती आणण्यापूर्वीची तयारी
- गणेश मूर्ती घरामध्ये आणण्यापूर्वी घर स्वच्छ करा. ज्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे, ते स्थान देखील स्वच्छ करावे.
- कारखान्यातून मूर्ती घरी आणताना मूर्ती कायम पांढऱ्या रंगाच्या कापडाने झाकावी आणि मूर्ती व्यवस्थित सांभाळून घरी आणावी.
- गणेश मूर्ती निवडताना विशेषतः रंगाची काळजी घ्यावी. लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या मूर्तीची निवड करावी.
- कारखान्यातून मूर्ती घरी नेण्यापूर्वी श्रीफळ वाढवावे.
- गणेश मूर्ती चुकूनही जमिनीवर ठेऊ नये. चौरंगावर लाल रंगाचे कापड ठेवून त्यावर मूर्ती ठेवावी.
- ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करायची आहे, तेथे आधी कुंकवाने स्वस्तिक चिन्हांकित करावे.
- पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्याच मूर्तीची निवड करावी.
घरामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना कशी करावी?
- घरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी पहाटे उठून स्नान करावे.
- पूजा करताना सर्व सामग्री पूजेच्या जागी आणून ठेवावी.
- गणपतीची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम एका कलशामध्ये गंगाजल किंवा शुद्ध पाणी घ्यावे.
- कलशामध्ये नाणी देखील ठेवावी. त्यावर आंब्याच्या डहाळ्या ठेवून श्रीफळ ठेवावे.
- तांदळावर कलश स्थापित करावे.
- दीप प्रज्वलित करून श्रद्धा आणि विश्वासाने गणपती बाप्पाला आवाहन करावे.
- गणपती मूर्तीवरील कापड काढावे. मूर्तीवर गंगाजल शिंपडावे आणि कुंकू चंदनाचा टिळा लावावा.
- गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूस दोन सुपाऱ्या ठेवाव्या. यास रिद्धि सिद्धिचे प्रतीक मानले जाते, सुपाऱ्यांना कुंकू चंदन अर्पण करावे.
- गणेश मूर्तीला पुष्प, दुर्वा, फळे, मोदक, लाडू अर्पण करुन 'ॐ गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा.
- गणपतीची पूजा केल्यानंतर गणपति सहस्त्रनाम किंवा गणेश चालीसाचे पठण करावे.
- पूजा संपन्न झाल्यानंतर आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: श्री गणेशाची 108 नावं उच्चारुन दुर्वा अर्पण करा, गणरायाकडून मिळतील मोठे लाभ)
गणेश मूर्ती किती दिवस घरामध्ये ठेवावी?
हिंदू मान्यनेनुसार गणेशोत्सव 11 दिवस साजरा केला जातो. 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही घरांमध्ये गणपती दीड दिवस, पाच दिवस तसेच सात दिवसांसाठी असतात. गणेश मूर्तीचे विसर्जन देखील विधीवत करावे.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना कशी करावी? पूजा साहित्य, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या एका क्लिकवर)