Gudi Padwa 2024 Date and Time: गुढीपाडवा (Gudi Padwa) सण म्हणजे मराठी नूतन वर्ष. तसेच साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यंदा 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा सण राज्यभरात साजरा केला जाणार आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आहे. कारण हिंदू धर्मानुसार या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने नवीन वर्षांचे जल्लोषामध्ये स्वागत केले जाते. पण गुढीपाडव्याची पूजा कशी करावी? कोणत्या मुहूर्तावर गुढी उभारावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
गुढी उभारताना कशी करावी पूजा?
- गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa 2024) दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करावे.
- यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आब्यांच्या पानांचे तोरण बांधावे.
- गुढी उभारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या काठीला तेल-हळद लावून स्नान घालावे.
- काठीस हळदी कुंकू लावावे. यानंतर पाने-फुलांचा हार, साखरेच्या गाठीची माळ आणि वस्त्र बांधून काठी सजवावी व त्यावर कलश पालथे ठेवावे. ही गुढी आपल्या घरासमोर किंवा प्रवेशद्वाराजवळ उभारावी.
- गुढीसमोर सुंदर रांगोळी काढावी.
- गुढी उभारल्यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करावी व यानंतर नैवेद्य अर्पण करावा.
गुढी उभारण्यामागील काय आहेत कारणे?
- प्रभू श्री राम 14 वर्षांचा वनवास संपवून सीतामाता व लक्ष्मणासह अयोध्येमध्ये परतले. हा दिवस वर्ष प्रतिपदेचा होता.
- ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सृष्टीची निर्मिती केली होती, असेही म्हणतात.
या गोष्टी देखील ठेवा लक्षात
- गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन करणे महत्त्वाचे मानले जाते. कारण नवीन वर्षामध्ये निरोगी आरोग्य लाभते व विविध आजारांपासून आरोग्याचे संरक्षण होते,असे म्हणतात.
- कडुलिंबाचा पाला घातलेल्या पाण्याने आंघोळ करणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर मानले जाते.
- गुढीपाडवा ते राम नवमी हा कालावधी चैत्र नवरात्र किंवा श्री राम नवरात्र म्हणून देखील साजरा केला जातो. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. नवरात्रीमध्ये केलेल्या उपासनेमुळे देवी भक्तांवर वर्षभर कृपेचा वर्षाव करते, असेही मानले जाते.
शुभ मुहूर्त : गुढीपाडवा तिथी 2024
- 8 एप्रिल 2024: रात्री 11 वाजून 50 मिनिटांपासून प्रतिपदा तिथी आरंभ
- 9 एप्रिल 2024: रात्री 8 वाजून 30 मिनिटापर्यंत प्रतिपदा तिथी समाप्त
चौघडिया मुहूर्तानुसार
गुढी उभारण्यासाठी सकाळी 9 वाजून 33 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 07 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ आहे.
आणखी वाचा
Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण
Gudi Padwa: गोडवा पसरवणारे पुण्यातील 'घर', खवय्यांसाठी 20 प्रकारच्या पुरणपोळ्यांची मेजवानी
गुढीपाडव्याच्या दिवशी जगभर निघणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात कशी झाली?