जाहिरात
Story ProgressBack

गुढीपाडव्याच्या दिवशी जगभर निघणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात कशी झाली?

Gudi Padwa : डोंबिवलीच्या शोभायात्रेपासून प्रेरणा घेत आता वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतंत्र शोभायात्रा सुरु झालेल्या आहेत. पण, तरीही डोंबिवलीच्या या शोभायात्रेचं महत्त्व आजही कायम आहे.

Read Time: 5 min
गुढीपाडव्याच्या दिवशी जगभर निघणाऱ्या शोभायात्रेला सुरुवात कशी झाली?
Happy Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रेचं संपूर्ण जगभर आकर्षण असतं.
डोंबिवली:

Gudi Padwa 2024 : कोणत्याही वेळी लोकलला गर्दी असलेलं, मुंबईचं वेगानं वाढणारं उपनगर इतकीच डोंबिवलीची ओळख नाही. महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक शहर ही डोंबिवलीची मुख्य ओळख आहे. डोंबिवलीची ही ओळख निर्माण करण्यात गुढीपाडव्याच्या सकाळी निघाणाऱ्या शोभायात्रेचं महत्त्वाचं योगदान आहे. ढोलताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेत सजून आलेली  तरुणाई , रस्त्यावर संस्कार भारती रांगोळीचा सडा, सामाजिक संदेश देणारे वेगवेगळ्या संस्थांचे रथ हे चित्र गुढीपाडव्याच्या सकाळी डोंबिवलीत असतं.

या शोभायात्रेपासून प्रेरणा घेत आता वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतंत्र शोभायात्रा सुरु झालेल्या आहेत. पण, तरीही डोंबिवलीच्या या शोभायात्रेचं महत्त्व आजही कायम आहे. संपूर्ण जगभर याबाबत उत्सुकता असते. 1999 साली सुरु झालेल्या या सांस्कृतिक परंपरेचा इतिहास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

कशी झाली सुरुवात?

मुळचे डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला इंग्रजी नववर्षाचं जल्लोषात स्वागत करणाऱ्या तरुणाईला हिंदू नववर्षाचं महत्त्व कळावं हा त्याचा उद्देश होता, असं जोगळेकर सांगतात. जोगळेकर यांनी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या बैठकीत ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. त्याच वर्षी डोंबिवलीचे ग्रामदैवत असणाऱ्या गणेश मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे एखाद्या धार्मिक संस्थेच्या अंतर्गत हा उपक्रम सुरु करावा, असं मत डोंबिवलीचे तत्कालीन नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी व्यक्त केलं.

आबासाहेब पटवारी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर पहिली बैठक झाली. त्या बैठकीला सुमारे 150 तरुण उपस्थित होते.

आपल्याला ‘व्हॅलेंटाईन डे' सारख्या प्रथांना विरोध करण्यात वेळ न घालवता, चांगल्या रूढी, प्रथा सुरू करता येतील. त्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सुरु करुया, असं या बैठकीत निश्चित झालं.

स्वत: सुधीर जोगळेकर, आबासाहेब पटवारी, टिळक विद्यामंदिर माजी मुख्याध्यापक सुरेंद्र वाजपेयी यांच्यासह शहरातील प्रमुख व्यक्तींनी या कामात पुढाकार घेतला. गणेश मंदिर संस्थानानं यात्रेची जबाबदारी घेतली. त्यावर्षी एप्रिल महिन्यात गुढीपाडवा होता. डोंबिवलीकरांनी एकत्रित प्रयत्नातून मोठ्या उत्साहात पहिल्या वर्षी शोभायात्रा काढली. 

कसा झाला प्रसार?

डोंबिवलीत मिळालेल्या प्रतिसादानंतर पुढील वर्षापासूनच अन्य शहरांमध्येही यात्रा सुरु झाल्या. ठाणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथसह मुंबईतील गिरगावमध्येही ही यात्रा सुरु झाली. या सर्व ठिकाणी यात्रा सुरु करण्यासाठी समविचारी नागरिकांना एकत्र करणे, त्यांच्यासमोर स्वागत यात्रेचा विषय मांडणे, एखाद्या धार्मिक संस्थेला पुढाकार घेण्यास तयार करणे ही जबाबदारी आबासाहेब पटवारी यांनी पार पाडली. त्यासाठी त्यांनी राज्यभर प्रवास केला. या प्रयत्नातूनच स्वागत यात्रा या संकल्पनेचा विस्तार झाला. आज फक्त भारतात नाही तर जगभरात ही यात्रा निघते.  

डोंबिवलीत 1999 साली पहिल्यांदा निघालेल्या गुढीपाडवा शोभायात्रेचे छायाचित्र ( फोटो सौजन्य : मनोज मेहता)

डोंबिवलीत 1999 साली पहिल्यांदा निघालेल्या गुढीपाडवा शोभायात्रेचे छायाचित्र (सौजन्य : मनोज मेहता)

सामाजिक संदेश देणारी यात्रा

नववर्षाचं जल्लोषात स्वागत करत असतानाच सामाजिक भान जपण्याचं कामही या यात्रेदरम्यान होतं.  सर्वप्रथम भटके-विमुक्त प्रतिष्ठानच्या यमगरवाडीच्या वसतीगृहासाठी एक मूठ धान्य देण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं होतं. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत गोळा केलेले काही ट्रक धान्य यमगरवाडीला पाठवण्यात आलं होतं.   

गणेश मंदिराची तिजोरी झाली होती रिकामी!

शोभायात्रेच्या पहिल्या वर्षी 3 लाख रुपये खर्च आला होता. हा सर्व खर्च गणेश मंदिर संस्थानाने उचलला. मात्र यामुळे मंदिराची सगळी तिजोरी रिकामी झाली. त्यानंतर तत्कालीन मंदिराचे अध्यक्ष बंडोपंत कानिटकर यांनी हा खर्च आम्हाला परवडणारा नाही त्यामुळे यावर्षी ही यात्रा करणे शक्य नाही, असं पटवारी यांना सांगितलं.

पहिल्याच वर्षानंतर निर्माण झालेल्या या पेचप्रसंगावर कार्यकर्त्यांनीच मार्ग काढला. चांगला उपक्रम बंद करू नका. नागरिकांना सवय होईल आणि हळू हळू लोकसहभागातून ही यात्रा निघेल असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे पुढील आणखी दोन वर्ष मंदिराने हा खर्च उचलला. त्यानंतर पावत्या फाडून नागरिकांकडून पैसे घेतले जात होते. आता मात्र गणेश मंदिरांसह अनेक संस्था, राजकीय पक्ष यात्रेत खर्च करतात अशी जोगळेकर यांनी दिली. 

Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण
 

कशी होते तयारी?

यात्रेची तयारी जवळपास महिनाभर आधीपासून सुरू होते. अनेक संस्थांसोबत या विषयावर बैठका होतात. प्रत्येकजण आपल्या संस्थेमार्फत काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. या संस्थांचे सजवलेले रथ या यात्रेत सहभागी होतात. आयोजक या सगळ्यांना समान संधी देतात. या सगळ्या संस्थांना एकत्र बांधून ठेवणे हे आयोजन समितीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 

चार दिवस आधीपासूनच कार्यक्रमाला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी गणेश मंदिरात सायंकाळीं दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण मंदिरात दिवे लावले जातात. याहीवर्षी हा दीपोत्सव साजरा झाला. कोरोना कालावधीत दोन वर्ष ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नव्या उत्साहानं ही यात्रा सुरु आहे.  

डोंबिवलीतील शोभायात्रेत महिलांचा मोठा सहभाग असतो (फोटो सौजन्य : स्वप्नील शेजवळ)

डोंबिवलीतील शोभायात्रेत महिलांचा मोठा सहभाग असतो (फोटो सौजन्य : स्वप्नील शेजवळ)

या यात्रेत महिलांचा सहभागही मोठा असतो. पारंपारिक फेटा घालून दुचाकीवर यात्रेत मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर महिला यामध्ये सहभागी होतात. आता गिरगाव, ठाणे, पुणेसह वेगवेगळ्या भागात शोभायात्रा निघते पण, आमची यात्रा अधिक शिस्तशीर असल्याचा दावा डोंबिवलीकर करतात. दरवर्षी या यात्रेमध्ये एक थीम असते. यंदा राम मंदिर ही थीम आहे. 

डोंबिवलीकरांना ही यात्रा वर्षभर उत्साह देते. आनंदाचे क्षण या यात्रेत अनभवता येतात. सामाजिक संदेशाचे पालन करण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे. या व्यतिरिक्त हिंदू नववर्षाची आठवण सदैव या यात्रेनिमित्त वर्षभर मनात ताजी राहते.  एकमेकांना भेटणे नेहमी शक्य होत नाही, मात्र या निमित्ताने सगळे एकमेकांना भेटतात. त्यामुळे विचारांची देवाण घेवाण होते अशी भावना यात्रेत कायम सहभागी होणारा डोंबिवलीकर देवेश काळे याने व्यक्त केली.

डोंबिवलीजवळ आहे डॉक्टरांचं गाव, ZP शाळेत शिकून सर्वजण झाले डॉक्टर
 

आपल्या नववर्षाचं जल्लोषात स्वागत व्हावं, हा यात्रा सुरु करण्याचा हेतू होता. मधुकर चक्रदेव, आबासाहेब पटवारी, सुरेंद्र वाजपेयी यांनी माझ्या कल्पनेला मान्यता दिली. त्यामध्ये काहीतरी नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्यापैकी कुणीही नाही, मात्र हिंदू नवर्षाच्या दिवशी होणारी ही यात्रा कायम सुरु राहील, याची खात्री आहे, असं सुधीर जोगळेकर यांनी सांगितलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination