Hartalika Tritiya 2025 Date: हरितालिका तृतीया कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त, पूजेची मांडणी, आरती-कथा सर्व माहिती

Hartalika Tritiya 2025 Date And Time: यंदा हरितालिका तृतीया कधी आहे? व्रतेच्या पूजेची मांडणी कशी करावी? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधीसह सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 5 mins
"Hartalika Tritiya 2025 Date And Time: हरितालिका तृतीया व्रताची संपूर्ण माहिती"

Hartalika Tritiya 2025 Date And Time: हिंदू धर्मामध्ये हरितालिका तृतीया व्रत (Haritalika Vrat 2025) अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली इच्छित पती मिळवा म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत (Hartalika Tritiya 2025) केले जाते. यंदा हरितालिका व्रत कधी आहे? शुभ मुहूर्त, तिथी, पूजा विधी, आरतीसह पौराणिक कथा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

हरितालिका तृतीया 2025 कधी आहे? | When Is Hartalika Tritiya 2025 Date And Time

हरितालिका तृतीया व्रताची तारीख आणि वार : 26 ऑगस्ट 2025 मंगळवार 
हरितालिका तृतीया तिथी प्रारंभ : 25 ऑगस्ट दुपारी 12.35 वाजता
हरितालिका तृतीया तिथी समाप्ती : 26 ऑगस्ट दुपारी 01.54 वाजता

हरितालिका तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त | Hartalika Tritiya 2025 Shubh Muhurat

सकाळी 5.56 वाजेपासून ते सकाळी 8.31 वाजेपर्यंत पूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. यानुसार जवळपास अडीच तास पूजनासाठी मिळणार आहेत. 

हरितालिका या शब्दाचा अर्थ काय? | What Is The Meaning Of Hartalika  

हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी. पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रतास "श्री हरितालिका व्रत" असे म्हणतात. 

हरितालिका तृतीया पूजनाचे साहित्य | Hartalika Tritiya Puja Sahitya

  • हरितालिकेच्या मूर्ती (दोन) आणि शिवलिंग 
  • पाण्याने भरलेला तांब्या, ताम्हन, पळी भांडे 
  • पूजेच्या ताटात गंध, अक्षता, फुले, 12 विड्याची पाने, 10 सुपाऱ्या
  • दूध, दही, तूप, मध, साखर, गूळ  
  • दुर्वा, बेल, तुळस, कापसाची वस्त्रे, जानवे, कापूर, उदबत्ती, निरांजन
  • काडवाती, अत्तर, हळद-कुंकू, काजळ, शेंदूर, हिरव्या बांगड्या
  • करंडा, कंगवा, मणिमंगलसूत्र, पूजेतील पत्री
  • शहाळे, केळी, पाच प्रकारची फळे, दोन श्रीफळ 
  • एक भांडे भरुन वाळू शक्य असल्यास

हरितालिका तृतीयेच्या पूजेला लागणारी फुले | Hartalika Tritiya Puja Samagri  

  • अशोकाची पाने
  • आवळीची पाने
  • दुर्वाकुर पत्रे
  • कण्हेरीची पाने
  • कदंबाची पाने
  • ब्राह्मीची पाने
  • धोतऱ्याची पाने
  • आघाड्याची पाने
  • बेलाची पाने
  • सर्व प्रकारची पाने 

हरितालिका तृतीयेच्या पूजेला लागणारी पत्री 

  • चाफ्याची फुले
  • केवड्याची फुले
  • कण्हेरीची फुले
  • बकुळीची फुले
  • धोतऱ्याची फुले
  • कमळाची फुले 
  • शेवंतीची फुले
  • जास्वंदीची फुले
  • मोगऱ्याची फुले
  • अशोकाची फुले

हरितालिका तृतीयेच्या पूजेची मांडणी कशी करावी? | Hartalika Tritiya Puja Rituals 

  • प्रथम आपल्या घरातील देवतांना हळदकुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा.
  • विड्याची पाने दोन, त्यावर एक नाणे आणि एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा. 
  • चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे.
  • चौरंगावर मूठभर अक्षता पसरवून त्यावर हरितालिकेच्या दोन मूर्ती ठेवून नंतर वाळूचे शिवलिंग तयार करावे.
  • उजव्या बाजूस सुपारी किंवा श्रीफळावर गणपती मूर्ती ठेवावी. 
  • मूर्तीसमोर पाच विडे मांडून त्यावर सुपारी, खारीक, बदाम, नाणे फळ ठेवावे. 
  • प्रथम स्वतःला हळद कुंकू लावावे. यानंतर घरातील देवांसमोर विडे ठेवून अक्षता आणि हळदकुंकू अर्पण करुन प्रार्थना करावी. 
  • घरातील वडिलधाऱ्या मंडळींना नमस्कार करुन पूजेस प्रारंभ करावा. 
  • व्रतासाठी स्वच्छ केलेल्या जागेवर चौरंग ठेवावे. चारही बाजूही केळीच्या खांबांनी सजवावे. 
  • चौरंगावर माता पार्वती आणि भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना करून षोडशोपचारे पूजा करावी. 
  • धूपदीप, नैवेद्य अर्पण करुन पत्रीफुले वाहून पूजा करावी. 
  • हरितालिकेच्या दिवशी पूजा केल्यानंतर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी इत्यादी पारंपरिक खेळ खेळतात.
  • हरितालिकेचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे.  

श्री हरितालिकेची आरती | Hartalika Tritiya Aarti 

जय देवी हरितालिके ॥ सखी पार्वती अंबिके ॥ 
आरती ओवाळीते ॥ ज्ञानदीपकळिके ॥ धृ० ॥ 
हर अर्धांगी वससी। जासी यज्ञ माहेरासी ।
तेथे अपमान पावसी। यन्नकुंडी गुप्त होसी ॥ जय० ॥1॥ 
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं। कन्या होसी तूं गोमटी ॥ 
उग्र तपश्चर्या मोठी ॥ आचरसी उठाउठी ॥ जय० ॥ 2॥
तपपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें ।॥
केली बहू उपोषणें। शंभु भ्रताराकारणे ॥ जय० ॥ 3॥
लीला दाखविसी दृष्टी । व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी। मज रक्षावे संकटी ॥ जय० ॥4॥
काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण ॥
माते दाखवी चरण ॥ चुकवावे जन्ममरण ॥
जय देवी हरितालिके ॥ सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीते ॥ ज्ञानदीपकळिके ॥5॥

Advertisement

Photo Credit: Canva

हरितालिका तृतीया व्रताची उत्तरपूजा | Hartalika Tritiya Vrat Uttarpuja

दुसऱ्या दिवशी सकाळीच स्नान करून पूजेस गंध, पुष्प, अक्षता वाहाव्या. 
दहीभाताचा, गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. 
आरती म्हणून नमस्कार करावा. 
नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करावे.

हरितालिका तृतीयेचे व्रत का केले जाते?| Hartalika Tritiya Significance
  • सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व्रत करतात. 
  • कुमारिका इच्छित, आदर्श पतीप्राप्तीसाठी व्रत करतात. 
  • आध्यात्मिक दृष्ट्या या व्रतामुळे मन, वाणी, शरीराची शुद्धता, आत्मसंयम आणि भक्ती वाढण्यास मदत मिळते.  
हरितालिका तृतीया व्रताची कथा | Hartalika Tritiya Katha

माता पार्वती यांचे वडील हिमालय यांनी त्यांचा विवाह करण्याचे ठरवले. आपली स्वरूपसुंदर कन्या श्रीविष्णूस द्यावी, असे नारदमुनींनी त्यांना सुचवले. हिमालय यांना वाटले, विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे. त्यांनी ही गोष्ट पार्वती माताला सांगितली. तेव्हा पार्वती म्हणाल्या की, 'त्रैलोक्याचे अधिपती, कैलासाधिपती शंकर माझे पती व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत. मी दुसऱ्या कुणालाही वरणार नाही!' 'तुझ्यासारखी स्वरूपवती स्त्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल. तुला मी श्रीविष्णूस देणार आहे! तोच तुला योग्य वर आहे!' हिमालय म्हणाले.

Advertisement

'नाही. मी शिवशंकराला मनाने वरले आहे. पार्वती ही शिवाची शक्ती आहे!' असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले. आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली. शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपोषण केले. या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीया (Bhadrapad Shuddha Tritiya) होती. पार्वतीची भक्ती पाहून भगवान शंकराने बटुवेष धारण करुन तिच्यासमोर गेले.

'हे सुंदरी, तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस?' यावर पार्वती म्हणाली, 'कैलासनाथ श्रीशंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत केले आहे!' ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले, 'तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस. तुला तो वर मुळीच योग्य नाही! श्रीविष्णू सर्वगुणसंपन्न आहे, त्याला तू वर! शंकराचा नाद तू सोडून दे। कारण तो महाक्रोधी आहे. वाघाचे कातडे तो परिधान करतो. सर्पाची भूषणे धारण करतो. स्मशानात वास्तव्य करतो. त्याच्या सभोवती भूतगण असतात. म्हणून तुला मी हे सांगत आहे!' हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळल्या.

'हे शिवनिंदका, तू इथून चालता हो ! तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस ! तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले. नाहीतर तुला मी शिक्षा करणार होते!' पार्वती उद्गारली. शिवशंकर तिचे हे उद्गार ऐकून संतुष्ट झाले आणि त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले. भगवान शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले, 'पार्वती, तुला काय पाहिजे ते सत्वर माग!' ते ऐकून पार्वतीला आनंद झाला. ती म्हणाली, 'हे जगदात्म्या, जगदीश्वरा, तुझ्या अर्धांगी मला ठाव दे!'

'तथास्तु !' असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले.

यानंतर  हिमालयाने श्री शंकराचे आदराने षोडशोपचारे पूजन केले. शिवगौरी यांचे लग्न त्यांनी लावून दिले. अशी ही पुराणकथा आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)