Flaxseed Water Benefits: आरोग्य निरोगी राहावे, याकरिता लोक हल्ली वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करतात. यापैकीच एक पौष्टिक पर्याय म्हणजे अळशीच्या बिया (Flax Seeds). या छोट्या छोट्या बियांमध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो आणि योग्य पद्धतीने याचे सेवन केले तर आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे अळशीच्या बियांबाबत माहिती दिलीय. पाण्यात भिजवलेल्या अळशीच्या बिया रिकाम्या पोटी खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, याबाबत न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती जाणून घेऊया...
ऊर्जेचा सर्वोत्तम पर्याय
दीपशिखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्दी फॅट्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्त्रोत म्हणजे अळशीच्या बिया. हेल्दी फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच रिकाम्या पोटी अळशीच्या बिया खाल्ल्यास शरीराची चयापचयाची गतीही जलद होईल.
मेंदूचे आरोग्य
अळशीच्या बियांमधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीरासह मेंदूसाठीही इंधनाप्रमाणे कार्य करते. न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या माहितीनुसार, अळशीच्या बियांमुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळते, ज्यामुळे एकाग्रता क्षमता वाढते.
पोटाच्या समस्या
बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास डाएटमध्ये अळशीच्या बियांचा समावेश करावा. रात्रभर पाण्यात अळशीच्या बिया भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि शौचाशी संबंधित समस्याही दूर होतात.
अळशीच्या बियांचे सेवन कसे करावे?
- एक चमचा अळशीच्या बिया मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पावडर तयार करा.
- अळशीच्या बियांची पावडर ग्लासभर पाण्यात मिक्स करा.
- सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्यावे.
अळशीच्या बिया खाण्यापूर्वी या गोष्टीचीही काळजी घ्यावी
एखादी अॅलर्जी असल्यास किंवा पोटाशी संबंधित समस्या असल्यास अळशीच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नक्की वाचा: भाजलेल्या अळशीच्या बिया खाण्याचे फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)