Walnuts Benefits: सुकामेवा आरोग्यासाठी सुपरफुड मानले जाते, याद्वारे शरीरास कित्येक फायदे मिळतात. पण योग्य वेळेतच सुकामेवा खाल्ल्यास फायदे मिळतील, हे तुम्हाला माहितीय का? कारण चुकीच्या वेळेस ड्रायफ्रुटचे सेवन केले तर कोणतेही लाभ मिळणार नाहीत. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि यकृत तज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करुन सुकामेवा खाण्याची योग्य वेळेबाबत दिलेली माहिती जाणून घेऊया.
बदाम
डॉक्टर सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बदाम सकाळच्या वेळेस खावे. यातील व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअम रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते. तसेच एकाग्रता क्षमताही वाढते.
अक्रोड
काही लोक अक्रोड सकाळच्या वेळेस खाणे पसंत करतात. पण डॉक्टर सौरभ सेठी यांच्या माहितीनुसार, अक्रोड सकाळीऐवजी संध्याकाळच्या वेळेस खावे. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि मेलाटोनिनचे प्रमाण अधिक असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करते तर मेलाटोनिनमुळे झोप चांगली येते. त्यामुळे अक्रोड संध्याकाळच्या वेळेस खाल्ल्यास चांगली झोप मिळेल आणि मेंदूलाही आराम मिळेल.
(नक्की वाचा: रिकाम्या पोटी हा सुकामेवा भिजवून खाण्याचे फायदे, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो)
पिस्ता
डॉक्टर सेठी यांच्या माहितीनुसार, दुपारच्या वेळेस पिस्ता खाणे फायदेशीर ठरू शकते. यातील प्रोटीन आणि फायबरमुळे शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकून राहते आणि वारंवार खाण्याची इच्छाही कमी होते.
(नक्की वाचा: Sleeping Problems: झोप येत नाही? गोळ्या घेण्याऐवजी खा हा सुकामेवा, गाढ आणि शांत झोप येईल)
काजू
डॉक्टर सेठी यांनी काजू दुपारच्या जेवणासोबत खाण्याचा सल्ला दिलाय. यातील झिंक आणि लोहामुळे शरीराची चयापचयाची गती सुधारेल आणि रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होईल.
एखाद्या ड्रायफ्रुटची अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्याशिवाय डाएटमध्ये त्याचा समावेश करू नये.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)