Heart Health Tips: डॉ. तमिरुद्दीन दानवडे, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई
जेव्हा हृदय आकुंचन पावते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमधून सर्व अवयव आणि पेशींमध्ये दबावासह रक्त वाहून नेते. रक्तप्रवाहामुळे मोठ्या रक्तवाहिन्यांवर येणारा दाब रक्तदाबाच्या स्वरुपात मोजला जातो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. धमनींच्या होणाऱ्या नुकसानापासून ते हार्ट फेल्युअरपर्यंत त्याचे परिणाम गंभीर आढळून येतात.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब खूप जास्त असतो तेव्हा त्यास उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते. या स्थितीमुळे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. कालांतराने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते ज्यामुळे उच्च रक्तदाब हा हृदयरोग आणि स्ट्रोकच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरतो आहे. हल्ली उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढली असून अनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, लठ्ठपणा, धूम्रपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, वय, हार्मोनल असंतुलन किंवा मूत्रपिंडाचा आजार असे घटक यास कारणीभूत ठरतात. उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत म्हणूनच अनेक लोकांना त्यासंबंधी गुंतागुंत निर्माण होईपर्यंत त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे हे कळून येत नाही. काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी, दम लागणे, छातीत अस्वस्थता किंवा दृष्टी दोष आढळून येऊ शकतो. ही लक्षणे तेव्हाच दिसून येतात जेव्हा रक्तदाब धोकादायक पातळीवर पोहोचतो किंवा अवयवांना नुकसान पोहोचवू लागतो.
(नक्की वाचा: Gastric Cancer: पोटाच्या कॅन्सरची लक्षणे दिसून येत नाही, वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या माहिती)
उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे कसे नुकसान होते?
उच्च रक्तदाब हृदयाचे अनेक प्रकारे नुकसान करू शकते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने तसेच त्यांची लवचिकता कमी झाल्याने त्यांना हानी पोहोचते ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो, ही स्थिती कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखली जाते. यामुळे छातीत दुखणे किंवा हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्याचप्रमाणे हृदयाचा कडकपणा किंवा अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, तसेच रक्तवाहिनी त्यानुसार आकार बदलू लागते. एखाद्याला हार्ट फेल्युअर आणि अचानक हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो. उच्च रक्तदाब अनेकदा रक्तातील साखरेची उच्च पातळी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आरोग्य समस्यांसह आढळून येते, ज्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम नावाची स्थिती उद्भवते. यामुळे स्ट्रोक आणि मधुमेहाची शक्यता वाढते. म्हणून उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आणि हृदयाचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
(नक्की वाचा: शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, शाकाहाऱ्यांसाठी ठरेल रामबाण)
या गोष्टींची घ्या काळजी
काही ठराविक गोष्टी उच्च रक्तदाब रोखण्यास किंवा ते नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. जसे की संतुलित जीवनशैली बाळगणे, ताजी फळं आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे, आहारातील मिठाचे सेवन मर्यादित करणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे गरजेचे आहे. वजन नियंत्रित राखणे, तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसन सोडणे तसेच योग आणि ध्यानधारणेच्या मदतीने ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यास मदत होईल.
उच्च रक्तदाब ही एक गंभीर आरोग्य स्थिती असली तरी तिचे व्यवस्थापन करणे आणि ती नियंत्रणात न ठेवल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करते. उच्च रक्तदाबाचे स्वरूप ओळखून आणि सक्रिय पावले उचलून हृदयरोगाचा धोका प्रभावीपणे कमी करू करता येऊ शकतो आणि निरोगी जीवन जगता येते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )