आपण सगळेच गाजराचा हलवा अगदी आवडीने खातो. कोणत्याही सण-समारंभाला, शुभ-कार्याला किंवा कोणी खास पाहुणे घरी येणार असले तर गाजराचा हलवा पानात असतोच. गाजराचा हलवा हा आपल्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेला आहे. पण त्याचा इतिहास आपल्याला माहित आहे का? गाजराच्या हलव्याचा उगम कसा झाला, त्याचा शोध कुठे लागला माहित आहे? चला जाणून घेऊया.
गाजराच्या हलव्याची जर आपण पाळंमुळं शोधली तर ती जगभरात अनेक ठिकाणी विखुरलेली दिसतात. आपण जितके त्याच्या उगमाच्या जवळ पोहोचतो नेमकी तिथून एक नवी गोष्ट सुरु होते. मूलतः हलवा हा शब्द 'हुलव' ह्या अरबी शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ होतो 'गोड'.
काय आहेत ऐतिहासिक संदर्भ?
विसाव्या शतकातील लेखक आणि इतिहासकार अब्दुल हलीम शरार यांनी लिहिलेल्या ‘गुझिष्टा लखनौ' या पुस्तकात गाजराच्या हलव्याबाबत एक संदर्भ सापडतो. तो असा की हलवा हा पदार्थ पर्शियातून भारतात आला. इंग्रजी भाषेत हा शब्द पहिल्यांदा १८५० मध्ये वापरण्यात आला.
हलव्याची पाककृती 13 व्या शतकातील अरबी मजकूर असलेल्या किताब अल-ताबीख मध्ये सापडली जे एक पाककृतीचं पुस्तक आहे. त्यात मुहम्मद इब्न अल-हसन इब्न अल-करिम यांनी हलव्याच्या वेगवेगळ्या पाककृतींचा उल्लेख केला आहे. अकबराच्या दरबारी इतिहासकारांपैकी एक असलेल्या अबुल फझलने 16 व्या शतकात - ऐन-इ-अकबरीमध्ये - हलव्याचा उल्लेख केला आहे. त्या काळी जेव्हा शासकांसाठी मांस वर्ज्य असे तेव्हा तयार करण्याच्या पदार्थांमध्ये हलव्याचा समावेश होत होता.
मात्र काही तज्ज्ञ 12 व्या शतकातील बायझंटाईन साम्राज्याला याचे श्रेय देतात.
साधारणतः 13 व्या ते 16 व्या शतकाच्या दरम्यान जगभरात हलवा लोकप्रिय झाला. याबाबत सुप्रसिद्ध खाद्य इतिहासकार कॉलीन टेलर सेन तिच्या 'फिस्ट्स अँड फास्ट्स' या पुस्तकात एक महत्वाचा संदर्भ देते. तिच्या मते, दिल्ली सल्तनत हलव्याला आपल्यासोबत भारतात घेऊन आली. आणि मग तेराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हलव्याला लोकप्रियता मिळाली.
भारताच्या वेगवगेळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे हलवे केले जातात. कर्नाटकात केळीचा हलवा, दक्षिणेत तिरुनेलवेली हलवा, पश्चिम बंगालचा छोलर डाळ हलवा, गुजरातचा मोहनलाल हलवा, शीखांकडे बनत असणारा कडा प्रसाद आणि लखनौचा जौझी हलवा असे त्याचे विविध प्रकार भारतात बनतात.
हिवाळा आणि गाजरं यांचंसुद्धा विशेष असं नातं आहे. ह्या नात्याचं श्रेय जातं डचांना. कारण मूळ अफगाणी असलेली ही गाजरं 17 व्या शतकात भारतात आणली ती डचांनी. ऑरेंजचा राजकुमार तिसरा विल्यम याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा घाट घालण्यात आला होता. इथे गाजर आणला गेल्यानंतर पंजाबमध्ये तो इतका लोकप्रिय झाला की सगळ्या पदार्थामध्ये त्याचा समावेश होऊ लागला. आणि मग गाजराचा मिठाईमध्ये वापर होऊ लागल्यानंतर जन्माला आला आपल्या सगळ्यांचा लाडका 'गाजराचा हलवा'.