- २०० वर्षांपूर्वी रेडीमेड कपड्यांचा वापर नव्हता आणि लोक अंगावर फिट होणारे कपडे टेलरकडे शिवायचे
- युद्ध काळात लाखो सैनिकांसाठी समान गणवेश तयार करण्यासाठी शरीराचे मोजमाप घेऊन साइजची संकल्पना जन्माला आली
- १८०० च्या दशकात सैनिकांच्या छातीच्या मापाच्या आधारावर स्मॉल, मीडियम आणि लार्ज अशी साइज ठरवण्यात आली
कपडे खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तरी म्हणजे कपड्यांची साईज. त्या साईज शिवाय कपडे खरेदी करणं तसं अवघड काम आहे. त्यामुळे कपडे खरेदी करताना कोणी 'S', 'M', किंवा 'L' यापैकी कोणती साईज आपल्यासाठी योग्य आहे ते पाहातो. मॉल असो वा ऑनलाइन शॉपिंग, साइज बघून कपडे निवडणे ही एक पद्धत होवून बसली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, पूर्वी जेव्हा ही साइज निवडण्याची पद्धत नव्हती, तेव्हा लोक कपडे कसे खरेदी करायचे? 200 वर्षांपूर्वीपर्यंत 'रेडीमेड कपडे' असा कोणताही प्रकार अस्तित्वात नव्हता. त्या काळात कपडे घेण्याचे दोनच मार्ग उपलब्ध होते.
त्यात श्रीमंत लोक थेट टेलरकडे जाऊन अंगाचे अचूक माप देत. त्यानुसार त्यांचे कपडे शिवून घेतले जात होते. तर दुसरीकडे, सर्वसामान्य कुटुंबांतील महिला घरीच स्वतः कपडे शिवायच्या. जुन्या किंवा मोठ्या कपड्यांना कापून लहान मुलांसाठी कपडे तयार केले जात होते. म्हणजेच कपडा कोणाचाही असो, तो एका विशिष्ट व्यक्तीच्या शरीरानुसारच त्याचे कपडे तयार केले जात होते. त्या काळात 'साइज' नावाचा कोणताही प्रकार नव्हता, फक्त 'फिटिंग' महत्त्वाची असायची. कपड्यांवर दिसणाऱ्या S, M, L या साइजची सुरुवात कोणत्याही फॅशन शो किंवा मोठ्या ब्रँडमुळे झालेली नाही हे ही तितकेच महत्वाचा मानायला हवे.
याची पाळेमुळे थेट युद्धभूमीशी जोडलेली आहेत. तसा इतिहास सांगतो. 1800 च्या दशकात जेव्हा नेपोलियनचे युद्ध झाले. त्यानंतर अमेरिकन गृहयुद्ध (Civil War) यांसारखी मोठी युद्धे सुरू झाली. त्याच वेळी सरकारांसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली होती. लाखो सैनिकांसाठी एकाच वेळी सारखाच गणवेश (Uniform) कसा तयार करायचा. त्यावेळी हा मुख्य प्रश्न होता. युद्ध काळात प्रत्येक सैनिकाचे स्वतंत्र माप घेणे अशक्य होते. 'बोल्ड मॅट्रिक्स रिसर्च ब्लॉग'च्या एका लेखानुसार, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कापड उत्पादकांनी हजारो सैनिकांच्या शरीराचे मोजमाप घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बहुतांश पुरुषांच्या छातीच्या (Chest) आकारात एक विशिष्ट पॅटर्न असतो. याच आधारावर त्यांनी पहिल्यांदा पुरुषांच्या गणवेशाचे स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे काही निश्चित साइज ठरवले.
हा प्रयोग भलताच यशस्वी ठरला. तिथपासूनच खऱ्या अर्थाने रेडीमेड कपड्यांची सुरूवात झाली. पुरुषांनंतर महिलांच्या कपड्यांसाठी साइज चार्ट तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. यासाठी वर्ष 1939 मध्ये अमेरिकन सरकारने एक मोठा सर्व्हे केला होता. या सर्वेदरम्यान 15,000 महिलांचे अचूक माप घेण्यात आले. याच डेटाच्या आधारे हळूहळू एक स्टँडर्ड साइज चार्ट विकसित करण्यात आला होता. ज्याला आज आपण S, M, L, XL म्हणून ओळखत आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जगभरातील फॅक्टरींमध्ये कपड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले, तेव्हा ग्राहकांच्या सुविधेसाठी ही सिस्टीम संपूर्ण जगाने स्वीकारली. ती आज ही अमलात आहे हे विशेष.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world