- मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे प्रवास वेळ 48 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे
- जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरने जोडणार
- महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून राज्यात सहाशे टक्के डेटा सेंटर क्षमता विकसित होत आहे
मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार आहे. मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यातून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत आहे. भारतातील सुमारे 60 टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स आणि चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविल्याचे ही वक्तव्य त्यांनी केले. केंद्र सरकारने राज्याला दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरमुळे उद्योग क्षेत्राला नवी गती मिळणार आहे असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी जेएनपीटी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडल्याची माहिती दिली. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च 7 ते 8 टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामुळे महाराष्ट्र जागतिक पुरवठा साखळीतील प्रभावी केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा 14 टक्के वाटा आहे. निर्यातीत हा वाटा 20 टक्क्यांपर्यंत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. जबिलच्या या अत्याधुनिक प्रकल्पात दिसणारी अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत असून मोबाईल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या जमीन सुधारणांमुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे उद्योगांना मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग 13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताला इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत जगातील अग्रगण्य राष्ट्र बनविण्यासाठी गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उच्च-अचूकता उत्पादनावर भर देण्याचे आवाहन करताना त्यांनी देशात चार सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प सुरू असून मुंबई–पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत, तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगून देशात मोठे औद्योगिक आणि पायाभूत परिवर्तन घडत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world