-डॉ.नरेंद्र धारणे, लेखक/ अभ्यासक
Holika Dahan 2025 Significance : होळी (Holi 2025) हा भारतातील एक प्रमुख सण आहे. होळी म्हणजे रंग, आनंद आणि भक्ती यांचा संगम मानला जातो. रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, ज्यास 'छोटी होळी' किंवा ‘होलिका पूजन' असेही म्हणतात. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणूनही होळी सण ओळखला जातो. होलिका दहन म्हणजे नकारात्मकता, अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे, सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील मानले जाते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
होलिका दहनाची पौराणिक कथा
होलिका दहनासोबत हिरण्यकश्यप, त्याचा पुत्र प्रल्हाद आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे. हिरण्यकश्यप हा असुरराजा होता, जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राज्यात विष्णूभक्तीवर बंदी घातली होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले. शेवटी त्याने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादला जाळण्याचा आदेश दिला. होलिकाला अग्नीपासून संरक्षण करणारा वरदानप्राप्त वस्त्र मिळाले होते. ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
(नक्की वाचा :Holi 2025: होळीनंतर या राशींची सुरू होणार साडेसाती)
होळीची पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेच्या साहित्यामध्ये काय असावे? (Holi Puja Muhurat)
पूजा करण्याची पद्धत
- स्वच्छ जागेवर होलिकेची रचना करावी.
- लाकूड, गवत, गव्हाच्या लोंब्या आणि गोवऱ्यांपासून होळी तयार करावी.
पूजेचे साहित्य : गंध, हळद-कुंकू, फुले, रोळी, गूळ, नारळ, अक्षता, सुपारी, कापसाची वात, गव्हाच्या लोंब्या, हरभरे आणि होळीचा प्रसाद.
पूजा विधी
- संध्याकाळी शुभ मुहूर्तावर होलिका दहनापूर्वी गणपतीची पूजा केली जाते.
- त्यानंतर होलिकेला हळद-कुंकू, फुले वाहून प्रदक्षिणा घालावी.
- होलिका दहन : होळीला अग्नी दिल्यानंतर गव्हाच्या लोंब्या, हरभरे आणि नारळ त्यामध्ये अर्पण केले जाते.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
होलिका दहन करण्यासाठी पंचांगानुसार प्रदोषकाल आणि भद्रानुसार शुभ वेळ निश्चित केली जाते. हा मुहूर्त संध्याकाळी असतो आणि पंचांग पाहून योग्य वेळ ठरवली जाते.
होलिका दहन मुहूर्त : रात्री 11.30 (PM) वाजेपासून ते मध्यरात्री 12.24 (AM) वाजेपर्यंत आहे.
होळीची पूजा करण्याचे महत्त्व आणि काय लाभ मिळतात?
- नकारात्मकता नष्ट होते : होलिका दहनामुळे जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
- आरोग्य सुधारते : होळीच्या अग्नीत अर्पण करण्यात येणारे गहू, हरभरे आणि औषधी पदार्थ हवेत शुद्धता निर्माण करतात.
- कुटुंबात आनंद आणि एकता येते : होळी हा रंगांचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे, त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नाते दृढ होते.
- धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात : होळीची पूजा केल्याने पापांचे क्षालन होते आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते, असे म्हणतात.
- शेती आणि उत्पादनासाठी शुभ काळाची सुरुवात : होळीच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात, यामुळे चांगले पीक आणि समृद्धी मिळते.
होळी (Holi 2025) हा केवळ रंगांचा सण नसून तो भक्ती, सकारात्मकता आणि आनंदाचा प्रतीक आहे. होलिका दहन आपल्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देतो आणि नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देतो. त्यामुळे हा सण उत्साहाने साजरा करावा आणि आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)