Kidney: तुमची किडनी नीट काम करत नाहीय, हे तुम्हाला कसं कळेल? किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षण काय आहेत?

Early Signs Of Kidney Failure: आपली किडनी योग्यरित्या काम करत आहे की नाही आणि त्याची सुरुवातीची लक्षणे काय असू शकतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Early Signs Of Kidney Failure: किडनी निकामी झालीय, हे कसं ओळखावे?"
Canva

Early Signs Of Kidney Failure: किडनी (Kidney) हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. किडनी रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि शरीरात पाणी तसेच क्षारांचे (minerals) संतुलन राखते. पण किडनीशी संबंधित आजार अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता बळावतात. यामुळेच अनेक लोकांना किडनीच्या समस्येचे निदान उशीरा होते. म्हणूनच किडनी व्यवस्थित कार्य करत आहे की नाही? किडनी खराब झाली असेल तर प्राथमिक संकेत काय असू शकतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

किडनीचे आरोग्य तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या? | Kidney Health News

  • किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करणे गरजेचे आहे. यामध्ये ब्लड टेस्ट (रक्त चाचणी) आणि युरिन टेस्ट (लघवीची चाचणी) सर्वात महत्त्वाच्या आहेत.
  • रक्तातील क्रिएटीनिन (Creatinine) आणि जीएफआरच्या (GFR - ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट) तपासणीवरून किडनी रक्ताचे शुद्धीकरण किती चांगल्या प्रकारे करत आहे, हे समजते.
  • तसेच युरिन टेस्टद्वारे लघवीमध्ये प्रथिने (Protein) किंवा इतर असामान्य घटक आहेत का? याचा शोध घेता येतो.

किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे

  • अनेकदा किडनी पूर्णपणे खराब होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. उदाहरणार्थ
  • शरीरावर सूज येणे: विशेषतः पाय, घोटा किंवा चेहऱ्यावर सूज येणे. जेव्हा किडनी अतिरिक्त पाणी आणि मीठ शरीराबाहेर काढण्यास असमर्थ ठरते, तेव्हा अशा समस्यांचा सामना करावा लागतो. 
  • लघवीमध्ये बदल: वारंवार लघवीला होणे, रात्रीच्या वेळी जास्त वेळा उठावे लागणे, लघवीला फेस येणे किंवा लघवीचा रंग गडद होणे हे किडनीच्या समस्येचे संकेत असू शकतात. काही लोकांना लघवी करताना जळजळ किंवा वेदनाही जाणवू शकतात.
  • थकवा आणि अशक्तपणा: सतत जाणवणारा थकवा हे देखील किडनीच्या समस्येचे एक लक्षण असू शकते.
(नक्की वाचा: What Not To Eat With Alcohol : दारूसोबत चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम)जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा काय होते?
  • जेव्हा किडनी योग्यरित्या काम करू शकत नाही, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ (Toxins) जमा होऊ लागतात. यामुळे अशक्तपणा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. याशिवाय भूक न लागणे, मळमळणे, त्वचेला खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
  • ज्या लोकांना मधुमेह, हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) किंवा लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांना किडनीच्या आजाराचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी ठराविक अंतराने किडनीची तपासणी करून घेतली पाहिजे. जर वरील लक्षणे वारंवार दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 
  • वेळेवर केलेली तपासणी आणि योग्य उपचारामुळे किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच रोखता येऊ शकतो.

(Disclaimer: हा लेख आकाश हेल्थकेअरच्या पीडियाट्रिक नेफ्रोलॉजी विभागातील सीनियर कन्सल्टंट डॉ. नेहा भंडारी यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित आहे.)