Lungs Recovery: धूम्रपान (Smoking) हे एक असे व्यसन आहे, जे एकदा जडले की सुटता सुटत नाही. सिगारेटमध्ये निकोटिन असते, जे तुमच्या मेंदूवर परिणाम करून आरामदायी आणि आनंददायी भावना निर्माण करते; ज्यामुळे धूम्रपान सोडणे कठीण होऊन बसते. पण धूम्रपानामुळे तुम्हाला कॅन्सर, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका (Heart Attack), फुफ्फुसांचे आजार आणि आरोग्याशी संबंधित अन्य अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. हे धोके लक्षात घेऊन अनेक जण धूम्रपान सोडण्याचा विचार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की दीर्घकाळ धूम्रपान केल्यानंतर जर तुम्ही ते सोडले, तर फुफ्फुसे पुन्हा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो? याबाबत एम्समधील (AIIMS) सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील कुमार यांनी 'एनडीटीव्ही'शी संवाद साधला.
धूम्रपानाचा शरीरावर होणारा परिणाम - (Effects of smoking tobacco on the body)
- तंबाखूचा धूर श्वासावाटे शरीरात घेतल्याने शरीरातील अनेक अवयव नुकसान होते.
- श्वसन नलिका (windpipe) आणि स्वरयंत्र (voice box) यामध्ये जळजळ होणे.
- फुफ्फुसांच्या हवेच्या नलिकांमध्ये सूज येणे आणि त्या आकुंचन पावणे, तसेच फुफ्फुसांच्या मार्गांमध्ये जास्त कफ जमा झाल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे आणि दम लागणे.
- फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका वाढणे, खोकला आणि धाप लागणे यासारखी लक्षणे दिसणे.
- फुफ्फुसांतील हवेच्या पिशव्यांचे कायमचे नुकसान होणे.
- रक्तदाब (Blood Pressure) आणि हृदयाचे ठोके वाढणे.
- त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणे.
- धमन्यांच्या आतील थराला नुकसान पोहोचणे.
- रक्ताभिसरणामध्ये अडथळा आल्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढणे.
- निमोनिया आणि इन्फ्लूएंजा यासारखे संसर्ग होण्याची शक्यता वाढणे.
- हाडे आणि स्नायूंच्या कार्यप्रणालीवरही तंबाखूच्या धुराचा वाईट परिणाम होतो.
(नक्की वाचा: Alcoholic Liver Disease: दारू खराब होती म्हणून लिव्हर खराब झालं? रुग्णाचा अजब दावा, डॉ. सरीन यांचा गंभीर इशारा)
धूम्रपान सोडल्यानंतर किती दिवसांनी फुफ्फुसे बरी होतात? (How many days after quitting smoking do the lungs recover?)
डॉक्टर सुनील कुमार यांनी सांगितले की, धूम्रपान सोडल्यानंतर तब्बल 15 वर्षांनी फुफ्फुसे हळूहळू सामान्य अवस्थेत येतात. म्हणजेच 15 वर्षांनंतर तुमचे फुफ्फुस एखाद्या कधीही धूम्रपान न केलेल्या (नॉन-स्मोकर) व्यक्तीच्या फुफ्फुसासारखे होण्याची शक्यता असते. काही वेळा या कालावधीतही फुफ्फुसे पूर्णपणे पूर्ववत होऊ शकत नाहीत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, धूम्रपान तुमच्या फुफ्फुसांवर किती भयानक आणि गंभीर परिणाम करते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)