जाहिरात

स्मार्टपणे मद्यपान कसं कराल? दुष्परिणाम कसे कमी कराल? कर्करोग तज्ज्ञांनी दिल्या 5 महत्त्वाच्या टिप्स

कर्करोग तज्ज्ञ डॉ. वर्तिका विश्वानी यांनी तिच्या एका व्हिडिओमध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या काही टिप्स सांगितल्या आहेत.

स्मार्टपणे मद्यपान कसं कराल? दुष्परिणाम कसे कमी कराल? कर्करोग तज्ज्ञांनी दिल्या 5 महत्त्वाच्या टिप्स

Reduce Alcohol Effects : सुट्टीच्या दिवसात बहुतेक जण पार्टीचा बेत आखतात. अनेक पार्टी दारुशिवाय अपूर्ण असते. कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक असतं. तरीही दारु ही पार्टीचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही तज्ज्ञाला दारुबाबत विचारलं तर ते दारू सोडून देण्यास सांगतील.  मात्र सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करीत असाल किंवा सोशल ड्रिंकर असाल तर, तुम्ही स्मार्टपणे काही गोष्टी हाताळू शकता. 

गुरुग्राम येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. वर्तिका विश्वानी यांनी तिच्या एका व्हिडिओमध्ये मद्यपानाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. त्या म्हणाल्या,  एक कर्करोग तज्ज्ञ म्हणून, जर मी तुम्हाला मद्यपान करू नका असं सांगितले, तर तुम्ही ऐकणार नाही. असं म्हणत त्यांनी अशा पाच गोष्टींवर जोर दिला, ज्या कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने करू नये.

नक्की वाचा - Drinking Water in the Moring : सकाळी उठल्या उठल्या खूप पाणी पिता? ही सवय पडू शकते महागात!


कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला, मद्यपान करताना या ५ चुका टाळा

डॉ. वर्तिका विश्वाणी यांच्या मते, तसे तर मद्यपान पूर्णपणे टाळणेच आरोग्यासाठी उत्तम आहे, पण जर तुम्ही सोशल ड्रिंकर असाल, तर शरीराचे नुकसान कमी करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:


१. 'बिंज ड्रिंकिंग' टाळा - एकाच वेळी अति मद्यपान करणं टाळा. कमी कालावधीत जास्त दारू पिऊ नका. पुरुषांनी ५ किंवा त्यापेक्षा जास्त आणि महिलांनी ४ किंवा त्यापेक्षा जास्त पेये पिऊ नये. यामुळे यकृतामध्ये 'एसिटाल्डिहाइड' नावाचा विषारी घटक तयार होतो. ज्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. यामुळे डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.


२. मद्यपान आणि धूम्रपान एकत्र करू नका - दारू आणि सिगारेट यांचे मिश्रण अत्यंत घातक असते. अनेकांना दारु पिताना मध्ये मध्ये सिगारेट ओढण्याची सवय असते. जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करता तेव्हा आरोग्याचा धोका फक्त वाढत नाही तर तो कित्येक पटीने २१ पटींपर्यंत वाढतो. यामुळे यकृतासोबतच फुफ्फुसांचेही मोठं नुकसान होतं.


३. व्हेपिंग (ई-सिगारेट) देखील धोकादायक - अनेकांना वाटतं की सिगारेटपेक्षा व्हेपिंग सुरक्षित आहे, पण डॉ. वर्तिका यांच्या मते ते तितकेच हानिकारक आहे. मद्यपान करताना व्हेपिंग करणे टाळावे.


४. रिकाम्या पोटी दारू पिऊ नका - रिकाम्या पोटी मद्यपान करणं ही शरीरासाठी सर्वात वाईट गोष्ट आहे. पोट रिकामे असल्यास शरीर अल्कोहोल वेगाने शोषून घेते. ज्यामुळे अवयवांचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. मद्यपान करण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक खाणं आवश्यक आहे.


५. वेगवेगळी पेये एकत्र करू नका - विविध प्रकारचे अल्कोहोल एकत्र केल्याने आपण नेमकी किती दारू प्यायलो याचा अंदाज येत नाही. यामुळे शरीरात विषारी घटकांचे प्रमाण वाढते आणि दुसऱ्या दिवशी तीव्र 'हँगओव्हर'चा त्रास होतो.

तुम्ही पार्टी करताना मजा करा, पण मद्यपानाचे प्रमाण मर्यादित राहील याची खात्री करा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com