Chemically Ripen Watermelons: उन्हाळ्यात कलिंगड या फळाचे सर्वाधिक सेवन केले जाते. कारण उष्माघातापासून बचाव करणे, शरीराचे डिहायड्रेशन टाळणे आवश्यक आहे. कलिंगड हे असे फळ आहे जे चविष्ट असण्यासोबतच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. पण सध्या बाजारात केमिकलचा वापर करून पिकवलेली कलिंगडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. न तपासता अशा कलिंगडची खरेदी केल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कलिंगड नैसर्गिकरित्या पिकवले गेले आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया...
केमिकलयुक्त कलिंगड कसे ओळखावे?
1. रंगाकडे लक्ष द्या
नैसर्गिकरित्या पिकलेले कलिंगड बाहेरून अतिशय चमकदार नसते. जर कलिंगडची साल चमकदार किंवा एकदम गडद हिरव्या रंगाची दिसत असेल, तर ते केमिकल वापरून पिकवलेले कलिंगड आहे, हे लक्षात घ्यावे.
2. कलिंगडचा आतील रंग तपासा
कलिंगड कापल्यावर त्याचा गर खूप गडद लाल दिसत असेल, तर त्यात केमिकलची भेसळ असण्याची शक्यता असते. तसेच जर कलिंगडच्या आतमध्ये पांढरे किंवा पिवळे डाग दिसत असतील, तर सावध व्हा.
3. बियावरून ओळखा
नैसर्गिकरित्या पिकलेल्या कलिंगडाच्या बिया काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाच्या असतात. जर तुम्हाला बिया पांढऱ्या किंवा अतिशय फिकट रंगाच्या दिसत असतील, तर कलिंगड केमिकलच्या मदतीने पिकवलेले असू शकते.
(नक्की वाचा: Injected Vegetables Test: भाजी नाही तुम्ही विष विकत घेताय, 5 मिनिटांत 5 ट्रिक्सने ओळखा इंजेक्शन आणि केमिकलयुक्त भाज्या)
4. सुगंध आणि चव
नैसर्गिकरित्या पिकवलेले कलिंगड चवीला गोड आणि ताजे असते. जर कलिंगड खाताना चव विचित्र, बेचव किंवा थोडी कडू लागत असेल, तर ते खाऊ नका. केमिकल वापरलेल्या कलिंगडामध्ये नैसर्गिक सुगंधही कमी असतो.
(नक्की वाचा: Homemade Curd: दुधात टाकताच घट्ट दही होते तयार... जाणून घ्या मॅजिक स्टोनचे फायदे, पारंपरिक पद्धत पुन्हा VIRAL)
Photo Credit: NDTV Marathi
5. वॉटर टेस्ट
कलिंगडाचा एक छोटा तुकडा कापून पाण्यात टाका. जर पाण्याचा रंग फिकट गुलाबी किंवा लाल होऊ लागला, तर त्यात कृत्रिम रंग (Artificial Color) मिसळल्याचे ते लक्षण आहे. नैसर्गिक कलिंगड पाण्यात रंग सोडत नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)