Silk Saree Shopping Tips: लग्नकार्य असो, एखादी पार्टी असो किंवा मोठा सण-उत्सव, सिल्क साडीचा राजेशाही लुक नेहमीच सुंदर दिसतो. प्रत्येक महिलेच्या कपाटात एखादी तरी सिल्कची साडी नक्कीच असते. पण अडचण तेव्हा येते, जेव्हा तुम्ही हजारो रुपये खर्च करून सिल्क साडी खरेदी करता आणि नंतर ती बनावट किंवा 'आर्टिफिशियल सिल्क' असल्याचं समोर येतं.
आजकाल बाजारपेठेत खऱ्या आणि खोट्या सिल्क कापडाची ओळख पटवणे कमालीचे कठीण झाले आहे; कारण नकली साड्याही हुबेहूब तितक्याच चमकदार आणि सुंदर दिसतात. जर तुम्हीही सिल्क साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या 9 सोप्या ट्रिक्सच्या मदतीने काही मिनिटांतच खऱ्या आणि खोट्यातील फरक ओळखा.
खऱ्या आणि बनावट सिल्क साडीमधील फरक कसा ओळखावा? (How to differentiate between real and fake silk)
1. बर्निंग टेस्ट (Burning Test)
सिल्क कापडाची खरी परीक्षा आगीच्या मदतीने केली जाऊ शकते. अर्थात तुम्ही पूर्ण साडी तर जाळू शकत नाही; म्हणूनच साडीच्या टोकाकडून एक छोटा धागा काढा आणि तो जाळून पाहा. धागा जळताना जर केस जळल्यासारखा वास आला आणि त्याची राख काळी झाली असेल तसेच हाताने चुरडता येईल अशी (Crushable) झाली, तर समजा सिल्क 100% अस्सल आहे. याउलट धागा जर प्लास्टिकसारखा वितळला आणि त्याची घट्ट गाठ बनली, तर ते नकली सिल्क आहे.
2. हाताने घासून पाहणे (The Rubbing Test)
अस्सल सिल्क कापड दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये ठेवून घासल्यास, त्यातून थोडी उब (उष्णता) निर्माण होते. सिल्क हा एक नैसर्गिक धागा (Natural Fiber) असल्याने घासल्यावर तो गरम होतो. याउलट सिंथेटिक किंवा बनावट सिल्क घासल्यास ते अजिबात गरम होत नाही, तर नेहमीसारखेच थंड वाटते.
3. रिंग टेस्ट (Ring Test)
ही ट्रिक प्रामुख्याने हलक्या वजनाच्या सिल्क साड्यांवर (जसे की 'चिनिया सिल्क' किंवा 'क्रेप सिल्क') अगदी अचूक ठरते. तुमच्या हातातील एक अंगठी काढा आणि साडीचे कापड त्या अंगठीमधून आरपार ओढून पाहा. अस्सल सिल्क मऊ असल्याने सहजपणे त्या छोट्याशा अंगठीमधून बाहेर पडेल. बनावट सिल्क मात्र अंगठीमध्ये अडकते किंवा चुरगळते.
4. साडीची चमक (Luster)
बनावट सिल्क कापडाला एकाच प्रकारची, कृत्रिम पांढर रंगाची चमक असते. पण अस्सल सिल्कचे वैशिष्ट्य वेगळेच असते. खऱ्या सिल्कचा रंग हलकासा बदलताना दिसतो. ही नैसर्गिक चमकच खऱ्या रेशीम धाग्याची मुख्य ओळख आहे.
5. जरीचे काम (Brocade Work)
सिल्क साड्यांवर प्रामुख्याने जरीचे नक्षीकाम असते. खऱ्या जरीमध्ये चांदीच्या किंवा सोन्याच्या तारा वापरलेल्या असतात. हे ओळखण्यासाठी साडी उलट करून (मागच्या बाजूने) पाहा. जर मागच्या बाजूला धागे खूप जास्त बाहेर आलेले किंवा टोचणारे असतील तर ते मशीनचे काम असू शकते आणि पर्यायाने सिल्कची गुणवत्ताही दुय्यम असण्याची शक्यता असते.
(नक्की वाचा : मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा)
6. किंमत (Price)
सिल्कची निर्मिती अत्यंत मेहनतीने केलेली असते; रेशमाच्या कीटकापासून नैसर्गिक धागा तयार करणे ही एक खर्चिक प्रक्रिया आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी अगदी कमी किमतीत (उदा. 1000 रुपये ते 1500 रुपयांत) 'प्युअर कांजीवरम' किंवा 'बनारसी सिल्क' देत असेल, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. चांगल्या गुणवत्तेसाठी योग्य किंमत मोजावीच लागते.
7. कापडाचा पोत (Texture Check)
अस्सल सिल्क अतिशय मऊ असते, त्याला स्पर्श केल्यास मखमली अनुभूती येते. तर नकली सिल्क हाताला थोडे कडक किंवा प्लास्टिकसारखे जाणवू शकते. शिवाय अस्सल सिल्क मुठीत घट्ट दाबून धरल्यास त्यावर सुती किंवा नकली कापडासारख्या कायमस्वरूपी चुरगळलेल्या सुरकुत्या पडत नाहीत.
(नक्की वाचा : Jeans Small Pocket: जीन्सला उजव्या बाजूला 'तो' छोटा खिसा का असतो? जाणून घ्या रंजक माहिती)
8. विणकामाची अचूकता (Weave Pattern)
हातमागावर (Handloom) विणलेल्या अस्सल सिल्क साड्यांच्या मागच्या बाजूला थोडेफार विणकामाचे डाग किंवा असमानता दिसून येते, जी त्यांची खासियत मानली जाते. याउलट मशीनवर बनवलेल्या नकली साड्या संपूर्णपणे 'परफेक्ट' आणि एकसारख्या दिसतात, जे त्या सिंथेटिक असल्याचाच पुरावा असतो.
9. पाण्याचा थेंब (Water Drop Test)
साडीच्या एका छोट्या कोपऱ्यावर पाण्याचा एक थेंब टाकून पाहा. अस्सल सिल्क पाणी लगेच शोषून घेते. याउलट सिंथेटिक सिल्क असेल तर पाण्याचा थेंब कापडावरून घरंगळून जातो किंवा बराच वेळ कापडावर तसाच तरंगत राहतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world