वातावरणात उकाडा वाढू लागला की माणसांच्या अंगाची लाही लाही होते. त्यावेळी आपल्या घरात मोठ्या हौसेनं लावलेल्या रोपांचं काय होणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. उन्हाळ्यात घरातील रोपं वाळतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.त्यांची योग्य काळजी घेतल्यास भर उन्हाळ्यात सुद्धा तुमच्या घरातील बाग हिरवीगार राहू शकते.
त्यासाठी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ह्या 6 टिप्स:
1. वातावरण समजून घ्या
तुमची बाग उन्हाळ्यासाठी तयार करण्याच्या दिशेने पहिली पायरी म्हणजे तुमच्या परिसरातील हवामानाची परिस्थिती समजून घेणे आणि तुमच्या रोपटयांना कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे हे ठरवणे. काही प्रदेशांमध्ये जास्त आर्द्रता असते,तर काही ठिकाणी कोरडी उष्णता असते.हवामानाच्या परिस्थितीवर काळजी घेण्याची पद्धत बदलते.
2. योग्य रोपे निवडा
एकदा तुम्हाला हवामान समजले की तुमच्या बागेसाठी योग्य रोपटी निवडू शकता. विशेषतः उन्हाळ्याच्या उष्ण आणि दमट परिस्थितीशी जुळवून घेणारी झाडे निवडा.अशा प्रजाती शोधा ज्या पूर्ण सूर्यप्रकाशात जास्त बहरतात आणि ज्यांना थोडं कमी पाणी दिलं तरी फरक पडणार नाही. बोगेनव्हिला,हिबिस्कस, पेरीविंकल आणि पोर्टुलाका यांच्यासह अनेक स्थानिक रोप हा सर्वोत्तम पर्याय असतो, कारण ती रोपटी स्थानिक हवामानाला तोंड देण्याच्या दृष्टीनेच विकसित झालेल्या असतात.
3.ओलावा कसा टिकवणार?
जमिनीतील किंवा कुंड्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या झाडांभोवती काही गोष्टींचा जाड थर लावा.चिरलेली पाने,पेंढा किंवा नारळाच्या काथ्या यांचे आवरण तुम्ही लावू शकता.ह्यामुळे मातीचे तापमान नियंत्रित राहते, झाडाची मुळे थंड राहतात आणि मातीचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण होते.संपूर्ण उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार पालापाचोळा पुन्हा भरण्याची काळजी घ्या.
4. रोपटयांना द्या सावली
थेट सूर्यप्रकाशापासून आपल्या रोपटयांचे संरक्षण करा. त्याने वाढीस चालना मिळते. त्यासाठी तुम्ही रोपट्यांपासून काही इंच वर कापडाचे आच्छादन करू शकता किंवा पेपराचे आच्छादन लावू शकता.दिवसभर सूर्याची बदलती स्थिती लक्षात घ्या आणि त्यानुसार सुद्धा रोपटी आणि त्यावरची आवरणं ह्याकडे लक्ष ठेवा.
5. माती अपग्रेड करा
उन्हाळ्याच्या हंगामात तुमची माती अपग्रेड करणे अत्यंत आवश्यक आहे. नवी माती उन्हाळ्यात आवश्यक ती पोषक तत्वे देतेच सोबत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.
6. नेहमीपेक्षा द्या अधिक पाणी
आपल्याला उन्हाळ्यात जास्त तहान लागते तशीच झाडांना सुद्धा जास्त पाण्याची गरज लागते. तुम्ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. उन्हाळ्यात झाडांना नेहमीपेक्षा जास्त पाणी घालावं. त्याने रोपटी टवटवीत राहण्यास मदत होते. सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही झाडांना पाणी घालू शकता.
ह्या टिप्स वापरून जर तुम्ही तुमच्या रोपटयांची काळजी घेतली तर ह्या उन्हाळ्यात तुमच्या घरची बाग नक्की हिरवीगार राहील.