How To Understand Introvert Person: इंट्रोवर्ट (अंतर्मुख स्वभावाचे लोक) लोक शांत, चिंतनशील आणि खोल विचार करणारे असतात. त्यांना एकटे किंवा छोट्या गटातच राहणं अधिक पसंत असते. गर्दीच्या ठिकाणी अंतर्मुख स्वभावाची व्यक्ती अस्वस्थ होतात आणि बहुतांश वेळेस ही मंडळी स्वतःच्याच जगात म्हणजे विचार- कल्पनांमध्ये हरवलेले असतात. त्यांच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता अधिक असते, पक्की मैत्री निभावण्यास ते प्राधान्य देतात आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी ते वेळ घेतात. तुमचीही एखादी मैत्रीण किंवा मित्र इंट्रोवर्ट असेल त्यांना कशा पद्धतीने समजून घ्यावे, याबाबत माहिती जाणून घेऊया...
अंतर्मुख स्वभावाच्या लोकांबाबतचे गैरसमज
बहुतांश वेळेस इंट्रोवर्ट लोकांबाबत गैरसमज करून घेतले जातात की ही मंडळी इतरांना समजून घेत नाहीत किंवा हे लोक एकलकोंडे असतात. त्यामुळे काही लोक त्यांना स्वतःमध्ये बदल करण्यासाठी दबाव आणतात. पण खरंतर तुम्ही त्यांना बदलण्याची नाही त्यांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण अशा लोकांना अनावश्यक गर्दीत राहणं आवडत नाही तर जेथे भावनांना खऱ्या अर्थाने आदर-सन्मान दिला जातो किंवा खरी नाती असतात तिथेच ही माणसं राहण्यास प्राधान्य देतात.
वर्ल्ड इंट्रोवर्ट डे कधी आणि का साजरा केला जातो?
पहिला वर्ल्ड इंट्रोवर्ट डे वर्ष 2011मध्ये साजरा करण्यात आला. मानसशास्त्रज्ञ आणि लेखिका फेलिसिटास हेने यांनी एक ब्लॉग पोस्ट प्रकाशित केली, ज्यामध्ये शांत स्वभावाच्या लोकांसाठी एक विशेष दिवस साजरा करण्याची कल्पना मांडण्यात आली होती, तेव्हापासून वर्ल्ड इंट्रोवर्ट डे साजरा केला जातोय. दरवर्षी 2 जानेवारी रोजी वर्ल्ड इंट्रोवर्ट डे साजरा केला जातो. खरंतर इंट्रोवर्ट लोक हे चुकीचे मानले जाणारे जाणारे अल्पसंख्याक आहेत, असे काही लोक गंमतीशीर पद्धतीने म्हणतात.
(नक्की वाचा: Future Faking Trend: पार्टनर मोठमोठी वचनं देतोय, तुम्ही फ्युचर-फेकिंगचा बळी ठरताय? Future Faking डेटिंग ट्रेंड म्हणजे काय?)
"तुम्ही आणखी बोलायला हवे"
शांत राहणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण आहे, असा काहींचा समज असतो. पण अंतर्मुख लोक तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्याकडे काही बोलण्यासारखं असते, उगाच काहीतरी बोलायचंय म्हणून ती मंडळी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना जास्त बोलण्यास भाग पाडणं किंवा इतरांशी जबरदस्तीने बोलायला लावण्याची चूक करू नका, कारण हे योग्य नाहीय. तसेच यावरून त्यांच्यात चुका शोधणं किंवा कमी लेखणे अधिकच चूक आहे.
"तुम्हाला समजून घेणे फार कठीण"इंट्रोवर्ट लोकांना कुणाच्याही सांगण्यावरून आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही. ही मंडळी भावना खोलवर अनुभवतात आणि विश्वासातील लोकांसमोरच व्यक्त होतात. त्यामुळे त्यांना मनातील भावना मांडायला लावण्यास दबाव टाकण्याचीही चूक करू नका. याउलट ते जसे आहेत तसे स्वीकारा आणि त्यांना वेळ द्या.
अंतर्मुख स्वभावाचे लोक स्वतःला ओळखत नाहीत?इंट्रोवर्ट लोक स्वतःला ओळखत नाहीत, असे काहींचे म्हणणं असतं. पण मंडळींनो हे लोक स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे त्यांना कुठेही येण्याची किंवा गर्दीमध्ये सहभागी होण्याची जबरदस्ती करू नका. तुम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकता पण दबाव आणू नका. या लोकांच्या मनात आणि ओठांवर एकसारखीच गोष्ट असते, त्यांना खोटं वागणं जमत नाही. अशी मंडळी तुमच्या आयुष्यात असतील त्यांना नावं ठेवण्याऐवजी जपा. कारण असे लोक कधीच साथ सोडत नाहीत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
