भारतातील लाखो मधुमेही रुग्णांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. मधुमेहाचे नियंत्रण आणि निदान करण्यासाठी 'HbA1c' (ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) ही रक्ताची चाचणी जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र भारतीयांच्या बाबतीत ही चाचणी अचूक निदान मिळेल अशी खात्री देता नाही. मधुमेहासंदर्भात संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनीच हे म्हटले असून त्यासंदर्भातील एक शोधनिबंधही या डॉक्टरांनी प्रसिद्ध केला आहे. प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक 'लॅन्सेट रिजनल हेल्थ'मध्ये सोमवारी हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नक्की वाचा: रोज डेपासून ते किस डेपर्यंत, वाचा 7 ते 14 फेब्रुवारपर्यंतची संपूर्ण लिस्ट
HbA1c चाचणीचे निदान अचूक का येत नाही?
भारतामध्ये रक्ताशी संबंधित आजारांचे मोठे प्रमाण आहे, यामुळे ही चाचणी अचूक निदान करण्यात फेल ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतात थॅलेसेमिया आणि सिकलसेल यांसारख्या अनुवांशिक आजारांसोबतच ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षयाचे प्रमाण खूप जास्त आहे. काही राज्यांमध्ये तर 50 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये रक्तक्षयाचा त्रास दिसून येतो. जेव्हा शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता असते किंवा हिमोग्लोबिनच्या संरचनेत दोष असतो, तेव्हा HbA1c चाचणी रक्तातील ग्लुकोजची चुकीची आकडेवारी दाखवू शकते. याव्यतिरिक्त, भारतात मलेरियाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात होतो, ज्यामुळे देखील चाचणीच्या निष्कर्षात फरक पडू शकतो, असे मुंबईतील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे.
HbA1c चाचणीवर अवलंबून राहणे ठरू शकते धोकादायक
HbA1c चाचणी ही मागील 2 ते 3 महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी मोजण्यासाठी केली जाते. यासाठी उपाशी पोटी राहण्याची गरज नसते. मात्र, भारतासारख्या देशात जिथे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड आहे, तिथे केवळ या एका चाचणीवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. केवळ HbA1c चाचणीवर विसंबून राहिल्यामुळे पुरुषांना डायबेटीस झालाय हे 4 वर्षांपर्यंत कळतच नाही असं काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. दक्षिण भारतात झालेल्या एका पाहणीत असेही दिसून आले की, ज्या रुग्णांना 'ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट'ने प्रीडायबेटिक घोषित केले होते, त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांचा रिपोर्ट HbA1c चाचणीत नॉर्मल आला होता.
नक्की वाचा: रात्री झोपण्या पूर्वी दात का घासावेत? दिवसातून किती वेळा ब्रश करण्याचा तज्ज्ञ देतात सल्ला
HbA1c चाचणीऐवजी कोणत्या टेस्ट कराव्या?
अचूक निदानासाठी डॉक्टरांनी आता जुन्या आणि पारंपरिक पद्धतींकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने उपाशी पोटी (Fasting) आणि जेवणानंतरची (Post-lunch) रक्तातील साखर तपासणी ही अचूक निदान आणि उपचारासाठी फायदेशीर ठरते. केवळ HbA1c वर अवलंबून न राहता 'ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट' किंवा घरी स्वतः ग्लुकोमीटरने साखर तपासणे (Self-monitoring) हे देखील फायदेशीर ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. TOI ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world