ITR Deadline 2026: जर तुम्हीही असे गृहीत धरून चालत असाल की इनकम टॅक्स रीटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक करदात्यासाठी (Taxpayer) एकच अंतिम मुदत (Deadline) नसते. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत नेमके कोणते आहेत आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारची ट्रेडिंग केली आहे, यावर तुमची आयटीआर भरण्याची शेवटची तारीख अवलंबून असते. काही लोकांसाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तर काही विशेष प्रकरणांमध्ये 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढू शकते.
31 ऑगस्टपर्यंत कोणाला ITR भरता येईल?
आर्थिक वर्ष (Financial Year) 2025-26 आणि निर्धारण वर्ष (Assessment Year) 2026-27 साठी प्रत्येकाची आयटीआर डेडलाइन 31 जुलै नाही. जर तुमच्या उत्पन्नामध्ये व्यवसाय (Business) किंवा पेशा (Profession) यातून मिळणाऱ्या कमाईचा समावेश असेल आणि तुमच्या खात्याचे 'टॅक्स ऑडिट' (Tax Audit) करणे बंधनकारक नसेल, तर तुम्ही 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आयटीआर फाईल करू शकता.
केवळ एक ट्रेड केला असला, तरी बदलू शकते डेडलाइन!
जर तुम्ही संपूर्ण वर्षभरात केवळ एकदा जरी 'इंट्राडे ट्रेडिंग' (Intra-day Trading) किंवा 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स'मध्ये (F&O) एकही ट्रेड केला असेल, तर इनकम टॅक्स विभाग तुम्हाला व्यावसायिक उत्पन्न असलेला (Business Income) करदाता मानतो. अशा परिस्थितीत तुमची आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ऐवजी थेट 31 ऑगस्ट 2026 होते. त्यामुळे तुम्ही पगारदार कर्मचारी (Salaried Employee) असलात, तरी वर्षभरात एकदा जरी इंट्राडे किंवा F&O ट्रेड केला असल्यास आपली डेडलाइन नक्की तपासून घ्या.
(नक्की वाचा: PF Interest: पीएफचे व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा! तुमच्या खात्यात पैसे आले का? चेक करा)
इंट्राडे आणि F&O वरील कराचे नियम काय आहेत?
कर नियमांनुसार, इंट्राडे ट्रेडिंगमधून होणारा नफा किंवा तोटा हा 'स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इनकम' मानला जातो. यावर तुमच्या सामान्य टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो. जर यामध्ये तोटा झाला तर तो केवळ स्पेक्युलेटिव्ह नफ्यामधूनच (Intra-day नफा) वळता (Set off/Adjust) केला जाऊ शकतो.
दुसरीकडे, फ्युचर्स अँड ऑप्शन्समधून (F&O) मिळणारे उत्पन्न किंवा तोटा हा 'नॉन-स्पेक्युलेटिव्ह बिझनेस इनकम' मानला जातो. यामध्ये शेअर्सची प्रत्यक्षात डिलिव्हरी होत नसली तरी इनकम टॅक्स कायद्यानुसार याला व्यावसायिक उत्पन्नाच्या श्रेणीतच ठेवले जाते.
कोणत्या लोकांसाठी 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे?
जर तुम्ही F&O ट्रेडिंग करत असाल तर सर्वप्रथम तुमची एकूण उलाढाल (Turnover) काढा. जर तुमची एकूण उलाढाल टॅक्स ऑडिटच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या खात्याचे टॅक्स ऑडिट करून घ्यावे लागेल. अशा प्रकरणांमध्ये आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2026 असेल. त्यामुळे आपल्याला फक्त पगार (Salary) मिळतो म्हणून आपली अंतिम मुदत नेहमी 31 जुलैच असेल, असे मानणे चुकीचे ठरेल. आयटीआर भरण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाची श्रेणी आणि कराचे नियम नक्की तपासून घ्या.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)