ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. भारतातील आघाडीच्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर सध्या iPhone 15, iPhone 16 आणि नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 17 सीरिजचे अनेक मॉडेल्स अचानक 'आउट ऑफ स्टॉक' दिसू लागले आहेत, किंवा काही ठिकाणाहून ते पूर्णपणे गायब झाले आहेत. सुरवातीला ही केवळ स्टॉकची नेहमीसारखी कमतरता वाटत असली, तरी यामागे जागतिक पातळीवरील चिप्सचा तुटवडा आणि पार्ट्सच्या वाढत्या किमती हे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
AI च्या युगामुळे मेमरी चिप्सचा तुटवडा
टेक विश्लेषकांच्या मते, या समस्येचे मूळ सध्या जगभरात सुरू असलेल्या AI च्या क्रांतीमध्ये आहे. AI सेवा चालवण्यासाठी क्लाउड सर्व्हिसेस आणि डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर DRAM आणि हाय-एंड स्टोरेज चिप्सचा वापर केला जात आहे. यामुळे स्मार्टफोन बनवण्यासाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सचा पुरवठा कमालीचा घटला आहे. गेल्या एका वर्षात या मेमरी चिप्सच्या किमती तब्बल 4 पटीने वाढल्या आहेत, ज्यामुळे ॲपलच्या सप्लाय चेनवर मोठा ताण पडला आहे.
(नक्की वाचा- IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली)
ॲपलचे सीईओंनी दिले दरवाढीचे संकेत
या संपूर्ण परिस्थितीवर खुद्द ॲपलचे सीईओ टिम कूक यांनी एका मुलाखतीदरम्यान चिंता व्यक्त केली आहे. टिम कूक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "कंपनीसाठी आता पार्ट्सच्या वाढलेल्या किमतींचा बोजा स्वतःच्या खांद्यावर सोसणे कठीण होत चालले आहे. दुर्दैवाने, आता आगामी काळात iPhone च्या किमतींमधील वाढ रोखणे अशक्य होत आहे." या विधानावरून कंपनी लवकरच आयफोनच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आगामी iPhone 18 सीरिजवर होणार थेट परिणाम
या महागाईचा आणि चिप्सच्या तुटवड्याचा सर्वात मोठा फटका या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच होणाऱ्या iPhone 18 सीरिजला बसेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. जाणकारांच्या मते, कंपनी iPhone 18 Pro च्या बेस मॉडेलच्या किमतीत कदाचित किरकोळ वाढ करेल. परंतु हाय-स्टोरेजअसलेल्या व्हेरियंट्सच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढू शकतात, कारण मेमरी चिप्स सध्या खूप महाग झाल्या आहेत.
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: 'ती' एक गोष्ट ओळखली असती तर केतनचा जीव वाचला असता; काय म्हणाले वडील विशाल अग्रवाल?)
तज्ज्ञांच्या मते, ॲपल आगामी सणासुदीचा काळ आणि भविष्यातील नवीन प्राइसिंग स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन आपली ऑनलाईन इन्वेंट्री री-ॲडजस्ट करत आहे. त्यामुळेच ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारपेठेतील उपलब्धतेमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे.