IAS Tukaram Mundhe: कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेली परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी आता काढून घेण्यात आली असून ती दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागातून बदली अन् पालक सचिव पदही गेले
प्रशासकीय सोयीसाठी आणि जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यासाठी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची 'पालक सचिव' म्हणून नियुक्ती करते. जिल्हा पातळीवरील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी हे अधिकारी पालकमंत्र्यांना मदत करतात.
(नक्की वाचा- Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट)
तुकाराम मुंढे हे मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असताना, 23 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्याकडे परभणीच्या पालक सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदी बदली करण्यात आली. मुंढे आता मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत, सरकारने त्यांचे परभणीचे पालक सचिव पदही काढून घेतले आहे.
(नक्की वाचा- Pune: दुर्घटना नव्हे हत्या! होणाऱ्या पत्नीनेच केतनला लोहगडावरून दरीत ढकललं, पोलिसांना संशय, कारण काय?)
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार परभणीचे नवे पालक सचिव
तुकाराम मुंढे यांच्या उचलबांगडीनंतर परभणी जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. डॉ. पुलकुंडवार हे सध्या राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा परभणी जिल्ह्याला फायदा होईल, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएमध्ये बदली आणि आता पालक सचिव पदावरून करण्यात आलेल्या या उचलबांगडीमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world