Jain Muni : जैन मुनी कपडे का घालत नाहीत? 'दिगंबर' या शब्दाशी आहे थेट संबंध? 5 मुद्द्यात समजून घ्या!

जैन मुनी निर्वस्त्र राहण्यामागील नेमकं कारण काय आहे? हा केवळ परंपरेचा भाग आहे का? यामागे कोणतं मोठं कारण?

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Why do Jainmuni not wear clothes? : जगभरात जैन धर्म कठीण तपस्या आणि अहिंसेसाठी ओळखला जातो. तुम्ही पाहिलं असेल दिगंबर जैन मुनी शरीरावर एकही कापड ठेवत नाहीत. थंडी असो वा कडक उन्हाळा... ते नेहमी एकाच अवस्थेत असतात. अनेकांच्या मनात असा सवाल उपस्थित होतो. जैन मुनी निर्वस्त्र राहण्यामागील नेमकं कारण काय आहे? हा केवळ परंपरेचा भाग आहे का? यामागे कोणतं मोठं कारण?

१ दिशांनाच आपलं वस्त्र मानणं...

'दिगंबर' शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ दिक् (दिशा) आणि अंबर (आकाश किंवा कपडे). म्हणजे मुनींसाठी चारही दिशा त्यांच्या वस्त्राप्रमाणे आहे. ते स्वत:ला एका विशिष्ट कपड्यांमध्ये बांधण्यापेक्षा संपूर्ण जग आणि आकाशालाही आपला पोशाख मानतात. त्यांच्यासाठी ईश्वराने रचलेली प्रकृतीच त्यांचं घर आणि वस्त्र आहे. 

२ कोणत्याही गोष्टीचा मोह नसणे...

जैन धर्मात अपरिग्रहाला महत्त्व असतं. याचा अर्थ कोणतीही वस्तू जमा न करणं. एका खऱ्या मुनीचा या जगातील कोणत्याही वस्तूबद्दल आकर्षण नसतं. जर ते कपडे घालतील, तर ते धुणे, वाळवणे आणि व्यवस्थित ठेवण्याचा विचार येईल. या सर्व गोष्टी आणि मोहातून दूर राहण्यासाठी ते कपड्यांचा पूर्णपणे त्याग करतात. 

Advertisement

३ छोट्या जीवांचं रक्षण करणं...

जैन मुनी अहिंसेचं सक्तीने पालन करतात. त्यांची मान्यता असते की, कपड्यांमध्ये घाम किंवा ओलावा असल्यास छोटे-छोटे किडे किंवा सूक्ष्म जीव निर्माण होऊ शकतात. जेव्हा असे कपडे धुतले जातात तेव्हा त्या निरपराध जीवांचा जीव जाऊ शकतो. जीव हत्याच्या या पापापासून वाचण्यासाठी मुनी कपडे घालत नाहीत. 

नक्की वाचा -  'पांढऱ्या पट्टीवर मांस-मच्छी शिजवून खाणार', जैन कुटुंबाच्या 'त्या' कृत्यानंतर वाद चिघळणार

४ थंडी-उष्णतेवर विजय मिळवणे...

कपड्यांशिवाय राहणं साधी-सुधी गोष्ट नाही. यामुळे मन आणि शरीर नियंत्रणात राहतं. जैन मुनी यामाध्यमातून स्वत:ला इतकं मजबूत करतात की, त्यांना ना कडक ऊन्हाचा त्रास होतो ना थंडीचा. माणसाचं मन जर मजबूत असेल तर शरीराची प्रत्येक गरज आणि त्रासावर विजय मिळवता येतं, हे त्यांच्या या वागणुकीवरून दिसून येतं.  

५ जन्माच्या वेळी ज्याप्रमाणे निरागसता आणि साधेपणा त्यानुसार....

जैन शास्त्रानुसार, मोक्ष मिळविण्यासाठी माणसाला साधं आणि निष्कपट असायला हवं, जन्माच्या वेळी एक निरागस बाळ असतं अगदी तसंच. एक लहानगं बाळ कपड्यांशिवाय निरागस आणि विकारांपासून दूर राहतो. तसंच मुनीदेखील लाज आणि दुनियादारीची बंधनं तोडून आपल्या नैसर्गिक अवस्थेत राहतात. याला 'यथाजात रूप' म्हटलं जातं, जे पूर्णपणे पवित्र मानलं जातं. 

( वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)