Kidney Failure : मूत्रपिंड निकामी होण्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो याबाबत तुम्हाला माहीत आहे का? मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे शरीरावरही दिसून येत असतात. विशेष म्हणजे मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणं डोळ्यांमध्येही दिसू शकतात. वेळीच ही लक्षणे ओळखल्याने मूत्रपिंडाचं नुकसान टाळता येऊ शकतं.
कोणती लक्षणं दिसतात?
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे किंवा बिघाडामुळे डोळ्यांभोवती सूज येणे, लालसरपणा येणे, जळजळ होणे आणि दृष्टी अंधुक होऊ शकते. जर तुम्हाला डोळ्यांभोवती सूज किंवा इतर कोणत्याही समस्या जाणवत असतील तर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोळ्यांभोवती सूज येणे
डोळ्यांभोवती सूज येणे हे मूत्रपिंडातून प्रथिनांची गळती होण्याचं लक्षण आहे. ज्यामुळे द्रव्य जमा होतं. ही स्थिती वैद्यकीय भाषेत नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणून ओळखली जाते. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या फिल्टर करू शकत नाहीत तेव्हा प्रथिने मूत्रात सोडली जातात. शिवाय, रक्तातील प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीराच्या ऊतींमध्ये द्रव जमा होतो, ज्यामुळे डोळ्यांभोवती किंवा पायांत सूज येते.
डोळ्यांत कोरडेपणा
मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे डोळे मिचकावण्यास त्रास होऊ शकतो. डोळ्यांतील अश्रू कमी झाल्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ देखील होऊ शकते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ हे मूत्रपिंडाच्या आजाराचे एक प्रमुख लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीत, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दृष्टी धूसर होणे
धूसर दृष्टी ही मूत्रपिंडाच्या समस्यांचे गंभीर लक्षण असू शकते. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. अंधुक दृष्टी मूत्रपिंड निकामी होणे, जळजळ होणे आणि व्हिटॅमिन ए च्या कमतरतेशी संबंधित आहे.