जाहिरात

Late Night Eating : रात्री 9 नंतर जेवणाची सवय आहे? दुष्परिणामांची यादी पाहून धक्काच बसेल!

ऑफिसचं काम, ट्रॅफिक, मोबाइल आणि टीव्हीचा वाढता वापर यामुळे अनेक लोक रात्री ९ नंतरच रात्रीचं जेवण करतात.

Late Night Eating : रात्री 9 नंतर जेवणाची सवय आहे? दुष्परिणामांची यादी पाहून धक्काच बसेल!

Late Night Eating : आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीत रात्री उशीरा जेवण ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. ऑफिसचं काम, ट्रॅफिक, मोबाइल आणि टीव्हीचा वाढता वापर यामुळे अनेक लोक रात्री ९ नंतरच रात्रीचं जेवण करतात. काही लोकांसाठी तर रात्री १० ते ११ च्या दरम्यान जेवण ही रोजची सवय बनली आहे.

ही सवय वरवर सामान्य वाटू शकते. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्री उशीरा जेवणाचा परिणाम केवळ पचनक्रियेवरच नाही तर हृदयाच्या आरोग्यावरही होतो. उशीरा जेवल्याने शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे दीर्घकाळासाठी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. रात्री ९ नंतर जेवल्याने हृदयाला काय नुकसान होतं?

शरीराचे 'बॉडी क्लॉक' कसं काम करतं?
 

आपल्या शरीरात २४ तासांचं एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला 'सर्कॅडियन रिदम' म्हटलं जातं. हे घड्याळ शरीर कधी जागं होणार, कधी झोपणार त्यानुसार हार्मोन कधी रिलीज होणार आणि अन्न कसं पचणार हे ठरवतात. रात्र होताच शरीराची हालचाल हळूहळू कमी होते, रक्तदाब कमी होतो आणि शरीर स्वतःला दुसऱ्या दिवसासाठी तयार करतं. परंतु, या काळात जर पचायला जड अन्न खाल्लं, तर आराम मिळण्याऐवजी शरीराला अतिरिक्त काम करावं लागतं.

नक्की वाचा - Banana Shape Mystery : केळं वाकडं का असतं? थेट सूर्याशी आहे संबंध...; वैज्ञानिक कारण वाचून हैराण व्हाल!

उशीरा जेवल्याने हृदयाला काय नुकसान होतं?

तज्ज्ञांच्या मते, रात्री उशीरा जेवल्यामुळे पचनक्रिया सक्रिय राहते. मात्र अशावेळी शरीर विश्रांतीच्या तयारीत असतं. त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. रात्री उशीरा खाल्ल्याने रक्तदाब बऱ्याच वेळेपर्यंत वाढलेला राहू शकतो. याशिवाय, शरीरातील साखर नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बराच काळ अशी समस्या राहिल्यास, च रक्तदाब, टाईप-२ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

रात्री उशीरा जेवल्याने हृदयाचं नुकसान...

काही संशोधनानुसार, जे लोक रोज रात्री उशिरा जेवतात, त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका जास्त असतो. रात्री उशीरा खाल्ल्याने बॉडी क्लॉकच्या कार्यात अडथळा येतो आणि हृदयाशी संबंधित अनेक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो. केव्हातरी उशीरा जेवल्याने मोठा फरक पडत नाही, पण ही रोजची सवय बनल्यास धोका नक्कीच वाढतो. 

झोपेची गुणवत्ता ढासळते...

रात्री उशीरा जेवण्याचा थेट परिणाम झोपेवर होतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने ॲसिडिटी आणि 'ॲसिड रिफ्लक्स'ची समस्या होऊ शकते. यामध्ये पोटातील ॲसिड अन्ननलिकेकडे येते. ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवते. झोप वारंवार मोडल्यास किंवा शांत झोप न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.  अपुऱ्या झोपेमुळे शरीरात जळजळ वाढू शकते आणि तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात.

रात्री शरीराला विश्रांतीची गरज का असते?

दिवसभर काम केल्यानंतर रात्रीची वेळ ही शरीराची दुरुस्ती आणि रिकव्हरीसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या काळात शरीराचे अनेक महत्त्वाचे अवयव स्वतःला रिचार्ज करतात. झोपताना रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो. परंतु, रात्री पचायला जड जेवण केल्यास अन्न पचवण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा लावावी लागते, ज्यामुळे शरीराची रिकव्हरी प्रक्रिया विस्कळीत होते.

कोणी जास्त काळजी घ्यायला हवी..

ज्यांना...

  • उच्च रक्तदाब
  • मधुमेह 
  • लठ्ठपणा
  • हृदयविकाराचा धोका 
  • कोलेस्टेरॉलची समस्या

अशा प्रकारच्या समस्या असतात, त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. 

जेवणाची योग्य वेळ कोणती?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान करणं सर्वात उत्तम मानलं जातं. तसेच, जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान २ ते ३ तासांचं अंतर असावे. यामुळे अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो आणि झोपही चांगली लागते.
रातचे जेवण पचायला हलकं आणि संतुलित असावं.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com