Mauni Amavasya 2026: सनातन परंपरेमध्ये पौष महिन्यातील कृष्णपक्षातील पंधरावी तिथी म्हणजे अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. या तिथीस मौनी अमावस्या असेही म्हणतात. मौनी अमावस्या वर्षातील सर्वात पवित्र अमावस्या मानली जाते. या दिवशी मौन पाळून आपल्या आराध्य देव-देवतांची साधना केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि इच्छाही पूर्ण होतात, असे म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान-दान, पूजन-हवन इत्यादी उपाय केल्यास सर्व पापदोषचा नाश होतात आणि पुण्यप्राप्ती होते. मौनी अमावस्येच्या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणते 10 महाउपाय करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
मौनी अमावस्या 2026 योग्य तारीख | | Mauni Amavasya 2026 Date | Mauni Amavasya
18 जानेवारी 2026, रविवार
मौनी अमावस्येचे 10 उपाय | Mauni Amavasya 10 Remedies | Amavasya January 2026 Timings
1. मौनी अमावस्येला मौन पाळणे आणि गंगास्नान करणं यास विशेष महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार मौन साधना केल्याने मन शांत आणि संतुलित राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मौन पाळल्याने वाणीशी संबंधित कोणताही दोष लागत नाही.
2. मौनी अमावस्या हा पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान इत्यादी गोष्टी कराव्या. ते शक्य नसेल तर पितरांच्या निमित्ताने अन्न, धन किंवा उबदार कपड्यांचे दान करावे.
3. हिंदू मान्यतेनुसार मौनी अमावस्येला प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पितरांसाठी स्नान-ध्यान केल्यानंतर गंगाजलासह कुश आणि काळ्या तिळांचा समावेश करून पितरांचे तर्पण करावे.
4. पितरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान-ध्यान केल्यानंतर पितृसूक्त किंवा पितृकवच याचे पठण करावे. तसेच संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा प्रज्वलित करावा.
5. मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून त्याभोवती प्रदक्षिणा घालावी आणि सुख-समृद्धी - सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. हिंदू मान्यतेनुसार तुळस ही मातालक्ष्मीचे स्वरूप आहे, म्हणून धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करावा.
6. तुळशीप्रमाणेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणेही अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. मौनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी मिक्स करून ते अर्पण करावे, दिवा प्रज्वलित आणि प्रदक्षिणा घालावी.
7. सनातन परंपरेमध्ये कोणत्याही पर्व किंवा पुजेचे पुण्यफळ मिळवण्यासाठी स्नानासह दान करणे उत्तम मानले जाते. त्यामुळे मौनी अमावस्येला आपल्या क्षमतेनुसार उबदार कपडे, अन्न, शिजवलेले भोजन आणि धनाचे दान करावे.
8. हिंदू मान्यतेनुसार सर्व प्रकारच्या दानांमध्ये गुप्त दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे मौनी अमावस्येला दान करताना त्याचा गाजावाजा न करता गुप्तपणे दान करावे. मदत करताना दुसऱ्याला त्याची जाणीव करून देऊ नये.
9. मौनी अमावस्येला दिव्यांग व्यक्तींना काळ्या रंगाची चादर, काळ्या रंगाचे बूट, चहा पावडर, काळ्या रंगाची उडदाची डाळ इत्यादी वस्तू दान केल्यास कुंडलीतील शनि, राहू आणि केतू संबंधित दोष दूर होतात, असे मानले जाते.
10. हिंदू मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी ठरते. त्यामुळे धन-धान्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून निरुपयोगी वस्तू बाहेर काढाव्यात. संध्याकाळी घरभर दिवे लावून माता लक्ष्मीची विशेष पूजा-आराधना करावी.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world