Mobile Recharge Price Hike: सर्वसामान्य मोबाईल ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील 3 ते 4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज दरांमध्ये तब्बल 12 ते 15 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ होऊ शकते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च' या ब्रोकरेज फर्मच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सध्याची मर्यादित स्पर्धा आणि कंपन्यांनी 5G नेटवर्कवर केलेली प्रचंड गुंतवणूक ही या संभाव्य दरवाढीची मुख्य कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरवाढ का होणार? अहवालातील मुख्य कारणे
- 5जी नेटवर्कवरील प्रचंड खर्च - दूरसंचार कंपन्यांनी देशभरात 5जी नेटवर्क उभारणीसाठी मोठी भांडवली गुंतवणूक केली आहे. ग्राहकांना सुरुवातीला विनामूल्य 5जी सेवा उपलब्ध करून दिल्यानंतरही कंपन्यांना अपेक्षित महसूल मिळालेला नाही. त्यामुळे हा मोठा खर्च वसूल करण्यासाठी टॅरिफ वाढवणे अपरिहार्य असल्याचे कंपन्यांचे मत आहे.
- मर्यादित स्पर्धा - सध्या भारतीय दूरसंचार क्षेत्रात फक्त 3 खाजगी कंपन्या आणि 1 सरकारी कंपनी (BSNL) कार्यरत आहेत. स्पर्धा मर्यादित झाल्यामुळे बाजारातील वातावरण स्थिर आहे, परिणामी कंपन्यांना दर वाढवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
- उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट - प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्याच्या उद्देशाने कंपन्या या दरवाढीचा मार्ग अवलंबत आहेत. आगामी काही तिमाहींमध्ये अशा प्रकारच्या आणखी 2 ते 3 दरवाढी होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)
प्रीपेड ग्राहकांना बसणार सर्वाधिक फटका
दूरसंचार कंपन्या गेल्या काही काळापासून मोबाईल टॅरिफ वाढवण्याचा विचार करत होत्या, मात्र ग्राहकांमध्ये तीव्र स्पर्धा असल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता स्पर्धा कमी झाल्यामुळे कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या आगामी दरवाढीचा सर्वाधिक थेट परिणाम हा प्रीपेड ग्राहकांवर होणार असून, यामुळे त्यांचे मासिक आणि वार्षिक बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.