सर्दी, तापासारख्या फ्लूचा संसर्ग क्षरोगाला आमंत्रण देऊ शकतो, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संशोधनात करण्यात आला आहे. 'नेचर कम्युनिकेशन्स' या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, इन्फ्लूएंझा म्हणजेच फ्लू (Flu) केवळ अंगदुखी किंवा आठवडाभराचा ताप आणत नाही, तर तो शरीराची क्षयरोग रोखण्याची क्षमता देखील कमकुवत करतो.
इम्पेरियल कॉलेज लंडनचे संशोधन
संशोधकांनी निरोगी स्वयंसेवकांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. फ्लूचा विषाणू मानवी शरीरातील अशा रोगप्रतिकारक मार्गांना दाबून टाकतो, जे टीबीच्या जिवाणूंना नियंत्रित ठेवतात. संशोधकांनी सुचवले आहे की, फ्लूची लस घेऊन फ्लू रोखल्यास टीबीच्या रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
भारतात लसीकरण का व्यवहार्य नाही?
मुंबईतील डॉक्टरांच्या मते, हा दृष्टिकोन भारतात व्यावहारिक नाही. कारण भारतात फ्लूच्या लसीची किंमत अंदाजे 2000 रुपये आहे, जी सर्वसामान्यांना परवडणारी नाही. जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी जवळपास 25% रुग्ण भारतात आहेत. एकट्या मुंबईत दरवर्षी तब्बल 60 हजार टीबी रुग्णांची नोंद होते.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, बीएमसीच्या (BMC) टीबी नियंत्रण कार्यक्रमात कार्यरत असलेले छातीचे विकार तज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल यांनी स्पष्ट केले की, "फ्लू आणि टीबी यांच्यात कोणताही थेट संबंध नाही. कोणताही संसर्ग झाला की शरीराची प्रतिकारशक्ती तात्पुरती कमी होते, ज्यामुळे इतर आजारांचा धोका वाढतो. मुंबईसारख्या अत्यंत गर्दीच्या शहरात, जिथे टीबीचा प्रसार सहज होतो, तिथे फ्लूमुळे हा धोका थोडा वाढू शकतो, पण हीच गोष्ट इतर कोणत्याही संसर्गाच्या बाबतीतही लागू होते."
(नक्की वाचा- प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम)
भारत हा जगातील सर्वाधिक टीबी रुग्णसंख्या असलेला देश असला, तरी आक्रमक तपासणी मोहीम आणि सामूहिक स्क्रीनिंगमुळे देशातील टीबीच्या प्रमाणात 21 टक्क्यांची मोठी घट झाली आहे. तसेच टीबी उपचार कव्हरेज आता 92 टक्क्यांच्या पार गेले आहे.